सोलापूर : जलसंधारणमंत्री तानाजी सावंत यांच्या गाडीने सोलापूरमध्ये एका तरुणाला उडवलं. या अपघातात तरुणाचा जागीच मृत्यू झाला. श्याम होळे असं मृत तरुणाचं नाव असून तो बार्शीतील शेलगाव गावातील रहिवासी असल्याची माहिती मिळतेय.

भाजीपाला विक्रीसाठी श्याम होळे आपल्या गावातून रोज बार्शीत जात होते. भाजी विक्री करुन परतत असताना आज (30 सप्टेंबर) सकाळी हा अपघात झाला. जलसंधारण मंत्र्यांच्या वाहनाने तरुणाचा जीव घेतल्यामुळे संतप्त जमावाने तानाजी सावंत यांची गाडी फोडली. तर जमावाकडून स्थानिक पत्रकारांनाही मारहाण करण्यात आली.

दरम्यान अपघात झाला त्यावेळी मी गाडीत नव्हतो. मी सध्या मुंबईत आहे. मात्र अपघातग्रस्त गाडी आपलीच असल्याची माहिती तानाजी सावंत यांनी 'एबीपी माझा'ला फोनवरुन दिली. अपघातामुळे रस्त्यावर नागरिकांनी गर्दी केली होती. तानाजी सावंत यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी जमावाने केली आहे. अपघाताची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

गेल्या काही दिवसांपूर्वी हंसराज अहिर यांच्या ताफ्यातील एका वाहनाचा अपघाता झाला होता. या अपघातामध्ये दोन सुरक्षारक्षकांचा मृत्यू झाला होता.