मुंबई : हिट अँड रन (Hit And Run New Law)  कायद्याविरोधात ट्रान्सपोर्ट युनियनच्यावतीनं संप पुकारण्यात आला आहे. आज या संपाचा दुसरा दिवस आहे. त्यामुळे आजपासून सर्व खासगी बसच्या चालकांसह इंधन वाहतूक करणाऱ्या टँकरचे चालकही संपावर (Truck Driver Strike)  आहेत. या संपाचा परिणाम आता दैनंदिन व्यवहारांवर पडायला सुरुवात झाली आहे. हिट अँड रनचा विषय गंभीर आहे पण राज्यातील जनतेला त्रास होऊ नये ही जबाबदारी राज्य सरकारची आहे, अशी प्रतिक्रिया शिवसेना उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत (Sanjay Raut) यांनी दिली आहे. ते मुंबईत बोलत होते.  


संजय राऊत म्हणाले,  राज्यात फक्त पेट्रोल डिझेलवरच नाही तर जीवनावश्यक वस्तूंवर याचा परिणाम झाला आहे.  पाणी, दूध, भाजीपाला सगळाचा पुरवठा बाधित झाले आहे. पोलिसांना मारहाण झाली असून राज्य सरकारनं केंद्राकडे याबाबत बोलणी करायला हवी. हिट अँड रनचा विषय गंभीर आहेच पण राज्यातील जनतेला त्रास होऊ नये ही जबाबदारी राज्य सरकारची आहे.


उद्धव ठाकरे आणि शरद पवारांमध्ये उत्तम संवाद : संजय राऊत 


लोकसभा जागा वाटपाच्या तिढ्यावरून सुरू असलेल्या चर्चांना उत्तर देताना संजय राऊत म्हणाले, उद्धव ठाकरे आणि शरद पवारांमध्ये उत्तम संवाद आहे. महाविकास आघाडीच्या  तिन्ही पक्षांमध्ये चांगला समन्वय आहे. काँग्रेससोबत चर्चा सुरू असून तातडीनं जाण्याची गरज नाही. भविष्यात गरज पडली तर आम्ही दिल्लीतही चर्चा करण्यात येईल. 


संजय राऊतांची राधाकृष्ण विखे पाटलांवर टीका


एक दोन जागेसाठी इंडियात कोणतीही तूट पडणार नाही. विखे पाटलांनी बरेच पक्ष बदलले, त्यांच्यावर मी काय बोलणार आहे. उद्या भाजपकडे सत्ता नसेल तेव्हा ते कुठे असतील हा त्यांनी विचार करावा, असे म्हणत संजय राऊतांनी राधाकृष्ण विखे पाटलांवर निशाणा साधला आहे.


पंतप्रधान चांद्रयानावर पण जाऊन प्रचार करू शकतात, राऊतांचा मोदींना टोला 


संजय राऊतांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीका केली आहे. संजय राऊत म्हणाले, पंतप्रधान मोदींनी उद्या दक्षिण ध्रुवावरून प्रचार केला तरी आश्चर्य वाटू नये. ते चांद्रयानावर पण जाऊन प्रचार करू शकतात. त्यांच्याकडे अमर्याद सत्ता आहे.


 



हे ही वाचा :