Jalna Latest Updates : समर्थ रामदासांच्या (Samarth Ramdas) जन्मगावी 'जांब समर्थ' येथील राम मंदिरातून (Ram Mandir) ऐतिहासिक मूर्ती चोरीला गेल्या आहेत. माहितीनुसार मंदिरातून 450 वर्षापूर्वीच्या मूर्ती चोरीला गेल्या आहेत. अज्ञात चोरट्यांकडून मंदिरातील ऐतिहासिक दुर्मिळ पंचधातूंच्या मूर्ती चोरी करण्यात आल्या आहेत.  समर्थ रामदासांनी स्थापित केलेली राम लक्ष्मण सीतेची मूर्ती देखील चोरीला गेली आहे. तसेच ऐतिहासिक पंचायतन (राम लक्ष्मण सीता, भरत, शत्रूघ्न) देखील चोरीला गेले आहे. 


समर्थ झोळीत ठेवत असलेली तसेच दंडावर बांधत असलेल्या मारुतीची मूर्ती देखील चोरीला गेली आहेत. घटनेची माहिती कळताच पोलिसांचे पथक घटनास्थळी पोहोचले. पोलिसांनी रात्री 3 च्या सुमारास चोरी झाल्याचा अंदाज व्यक्त केला आहे.  पाळत ठेऊन मंदिरातील चावी घेऊन चोरी केल्याचं समोर आलं आहे. दरम्यान या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. या प्रकरणाची पोलिस कसून चौकशी करत आहेत. 


विधानसभेत पडसाद, गृहमंत्री फडणवीस म्हणाले


विधानसभेत आमदार राजेश टोपे यांनी या चोरीचा मुद्दा उपस्थित करत म्हणाले की, पहाटे तीन वाजता चोरट्यांनी जांब समर्थ येथील मंदिरातील मुर्त्या चोरल्या आहेत. या घटनेमुळं जनमाणसात रोष आहे. समर्थ रामदासांच्या (Samarth Ramdas) जन्मगावी 'जांब समर्थ' येथील राम मंदिरात महाराष्ट्रभरातून भाविक येत असतात. राज्य सरकारनं या स्थळाला ब दर्जाच्या तीर्थक्षेत्र म्हणून घोषित केलं आहे. या ऐतिहासिक मंदिरात राज्यभरातून भाविक येत असतात. या प्रकरणाची गांभीर्यानं नोंद घेऊन कारवाई करावी, अशी मागणी राजेश टोपे यांनी विधानसभेत केली. 


यावर बोलताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, मला याबाबत सकाळीच माहिती मिळाली. मी या संदर्भात डीजींशी तात्काळ बोललो आहे. संपूर्ण ताकत लावून या प्रकरणाची चौकशी करावी आणि आरोपींना पकडून मुर्त्या परत आणाव्यात असे आदेश दिले आहेत, असं देवेंद्र फडणवीस यांनी म्हटलं आहे. 


जांब समर्थ हे समर्थ रामदास स्वामींचं जन्मगाव


जांब समर्थ हे समर्थ रामदास स्वामींचं जन्मगाव आहे.  हे ठिकाण जालना जिल्‍हयातील घनसावंगी तालुक्‍यामध्‍ये आहे.  हे राम मंदिर रामदास स्‍वामी यांच्‍या घरामध्‍ये स्‍थित आहे. समर्थ मंदिर हे संत रामदास स्‍वामी यांच्‍या आठवणीमध्‍ये बनविण्‍यात आले आहे. एका संस्‍थेमार्फत या मंदिराचे व्‍यवस्‍थापन पाहिले जाते.  


इतर महत्वाच्या बातम्या