Hingoli News: हिंगोली जिल्ह्यातील खांबाळा गावामध्ये वीजपुरवठा होत नसल्याने आक्रमक झालेल्या गावकऱ्यांनी विद्युत रोहित्राजवळ रात्री ठिय्या आंदोलन केले आहे. वसमत तालुक्यातील खांबाळा गावांमध्ये मागील बारा दिवसापासून वीज पुरवठा होत नसून नागरिकांना भर पावसाळ्यात अंधारात राहण्याची वेळ आली आहे.
खांबाळा गावात दहा ते बारा दिवसांपासून वीजपुरवठा खंडित झाला आहे. नव्याने आणलेले रोहित्र बसवताच ते जळाले असून महावितरणने याकडे पूर्णपणे दूर्लक्ष केले असून संतप्त ग्रामस्थांनी शनिवारी रात्री महिला व लहान मुलांसह थेट रोहित्राजवळच भरपावसात ठिय्या आंदोलन केले.
महावितरणणे रोहित्र बसवले खरे..
वसमत तालुक्यातील खांबाळा येथील रोहित्र गत १० ते १२ दिवसांपूर्वी जळाले होते. महावितरणकडे नवीन रोहित्र बसविण्यासाठी ग्रामस्थांनी मागणी केली होती. रोहित्रासाठी रक्कम मोजावी लागेल, असे महावितरणच्या कर्मचाऱ्यांनी सांगताच ग्रामस्थांनी रक्कम जमा करून १० जुलै रोजी नवीन रोहित्र आणले व बसविण्यात आले.
अभियंत्याकडून ठोस आश्वासन मिळेपर्यंत आंदोलन सुरुच
परंतु, वीजपुरवठा सुरळीत करताच नव्याने बसवण्यात आलेले रोहित्रही जळाले. त्यामुळे दुसरे रोहित्र बसवावे, अशी मागणी ग्रामस्थांनी केली. मात्र, याकडे महावितरणच्या अधिकाऱ्यांनी लक्ष दिले नसल्याचा आरोप आंदोलकांनी केला. दरम्यान, जोपर्यंत अभियंत्याकडून ठोस आश्वासन मिळत नाही, तोपर्यंत ठिय्या आंदोलन सुरूच ठेवणार असल्याचे ग्रामस्थांकडून सांगण्यात आले.
यादरम्यान वसमत तालुक्यातील वापटी येथील ३३ केव्ही वीज उपकेंद्राचे अभियंता राजू नंद यांच्याशी संपर्क साधण्याचा प्रयत्न केला. परंतु, त्यांनी बोलण्याचे टाळले, असेही आंदोलकांनी सांगितले.
महावितरणच्या कर्मचाऱ्यांचे दूर्लक्ष
महावितरणचे अधिकारी व अभियंता यांना वारंवार संपर्क साधूनही त्यांनी फोन उचलले नसल्याचे ग्रामस्थांनी सांगितले. गावात मागील १० ते १२ दिवसांपासून अंधार आहे. त्यामुळे ग्रामस्थांनी भ्ज्ञरपावसात टॉर्च सुरु करत रोहित्राखालीच आंदोलन सुरु केले आहे. जोपर्यंत वीजपुरवठा सुरळीत होत नाही तोपर्यंत आंदोलन सुरुच ठेवणार असल्याचे ग्रामस्थ सांगत आहेत. या आंदोलनात महिला व लहान मुलांना घेऊन नागरिक आंदोलनास जमले होते.
महावितरणकडून बीलाची वसूली दर महिन्याला अगदी १०० टक्के होत असते. मात्र, गाव १२ दिवसांपासून अंधारात असल्याचे सांगण्यात आल्यानंतर खंबाळावासींनी महावितरणविरोधात आंदोलन सुरु केलं आहे.
हेही वाचा: