हिंगोली : दुसरीही मुलगीच झाल्यामुळे नाराज झालेल्या पित्यानं तिला विष पाजल्याची खळबळजनक घटना समोर आली आहे. अवघ्या दहा दिवसांच्या चिमुरडीवर हिंगोलीतील रुग्णालयात उपचार सुरु आहेत. नराधम पिता रामकिशन जाधवला पोलिसांनी अटक केली आहे, तर बाळावर उपचार सुरु आहेत. एकीकडे 21 व्या शतकात मुली सर्वच क्षेत्रात अग्रेसर असताना, मुलींना ओझं समजण्याची मानसिकता दिसून येत असल्याने हळहळ व्यक्त केली जात आहे. हिंगोलीच्या वसमत तालुक्यातील बोराळा गावात राहणाऱ्या रामकिशनचं चार वर्षांपूर्वी अंजनाशी लग्न झालं होतं. त्यांना पहिलीही मुलगी आहे. दहा दिवसांपूर्वी दुसरीही मुलगीच झाल्यानं रामकिसन नाराज होता. या नाराजीतून त्यानं आपल्या दहा दिवसांच्या मुलीला विष पाजलं. मुलीच्या आईच्या तक्रारीवरुन पोलिसांनी रामकिशनला अटक केली आहे. आरोपी रामकिशन शिवाजी जाधव याच्याविरुद्ध कलम 307 अंतर्गत कुरुंदा पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.