Dhananjay Desai Arrest : हिंदू राष्ट्र सेनेचा प्रमुख धनंजय देसाई आणि साथीदारांना अटक करण्यात आली आहे. जमीन नावावर करुन देण्यास नकार दिल्याने एका शेतकऱ्याला बेदम मारहाण केल्याप्रकरणी अटक करण्यात आली आहे. मुळशीतील दारवली गावातील ही घटना असून याप्रकरणी प्रदीप शिवाजी बलकवडे (वय 35, रा. दारवली, ता. मुळशी, जि. पुणे) यांनी फिर्याद दिली आहे. धनंजय देसाई आणि साथीदारांना 9 ऑगस्टपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. 


याप्रकरणी धनंजय देसाई याच्यासह रमेश जायभाय, श्याम सावंत आणि 10 ते 15 साथीदारांवर गुन्हा दाखल केला आहे. पौड परिसरातील दारवली गावात बलकवडे कुटुंबीय राहायला आहेत. ते सचिन ठोंबरे यांच्या घरात बसले होते. त्यावेळी देसाईचे साथीदार घरात शिरले. देसाई यांच्या नावावर जमीन का करुन दिली नाही, अशी विचारणा करुन त्यांना धमकावले.


जमीन नावावर करुन दिली नाही तर तुझ्यासह कुटुंबीयांना ठार मारु, अशी धमकी दिली होती. बलकवडे यांना आरोपी श्याम सावंतने पिस्तुलाचा धाक दाखवून मारहाण केली. आरोपींकडे काठ्या आणि मारहाण करण्यासाठी लागणारं साहित्य होतं, असे बलकवडे यांनी फिर्यादीत म्हटले आहे. आरोपींनी गावातील नागरिकांना धमकावले. 


मुळशीतील दारवली परिसरात खळबळ


'तू तुझी जमीन धनंजय देसाई यास लिहून का दिली नाहीस तर तुला आणि तुझ्या कुटुंबाला खल्लास करुन टाकण्यास आम्हाला संगीतले आहे', अशी दमदाटी शिवीगाळ करुन शाम सावंत याने पिस्टल दाखवून आणि इतरांनी तलवार, लोखंडी रॉड काठ्यांनी फिर्यादी असलेल्या बलकवडे यांना जीवे मारण्याच्या उद्देशाने डोक्यात मारहाण करुन दुखापत केली आहे. या प्रकरणामुळे मुळशीतील दारवली परिसरात मोठी खळबळ उडाली आहे. 


गावकऱ्यांनी काढला मोर्चा...


धनंजय देसाई याने बारा वर्षांपूर्वी पौड भागात अतिक्रमण करुन घर बांधले आहे. देसाई हिंदू राष्ट्र सेना चालवत असून त्याची पार्श्वभूमी गुन्हेगारी आहे. त्याच्याविरुद्ध गंभीर गु्न्हे दाखल झाले आहेत. गोशाळेच्या नावाखाली पाळीव जनावरे शेतात सोडून दिली जातात. देसाईला जाब विचारल्यास तो ग्रामस्थांना धमकावतो. संघटनेच्या नावाखाली तो समाजात जातीय तेढ निर्माण करतो. त्याने हुलावळेवाडीतील तरुणांना मारहाण केली होती, असे समस्त ग्रामस्थ दारवलीकडून प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात म्हटलं आहे. दरम्यान, देसाईविरुद्ध कारवाई करण्यासाठी दारवली ग्रामस्थांनी पौड पोलीस ठाण्यावर मोर्चादेखील काढला होता.


हेही वाचा-


Dr. Pradeep Kurulkar : प्रदीप कुरुलकरांचा मुद्दा थेट पावसाळी अधिवेशनात; तपास NIA कडे सोपवा; पृथ्वीराज चव्हाणांची मागणी