पुणे: आंतरधर्मीय लग्न आपल्याकडे अगदीच नवीन नसली, तरी ती नेहमीची नाहीत हेही खरं. त्यातही ते लग्न जर हिंदू आणि मुस्लिम धर्मियांचं असेल तर त्याची चर्चा होतेच.. पुण्याच्या विश्रांतवाडी भागात आज एक असंच लग्न संपन्न झालं. विशाल पोखरकर आणि आरजू तांबोळी यांनी धर्मांच्या भिंती अलगद दूर केल्या.

 

आपल्या आजूबाजूला जिथे आंतरजातीय लग्न हाच चेहऱ्यावर प्रश्नचिन्ह आणि कपाळावर आठ्या आणतो, तिथं आंतरधर्मीय लग्नाचं स्वागत होईल अशी अपेक्षाच न केलेली बरी. जात पंचायतीनं आंतरजातीय लग्न केलेल्यांना वाळीत टाकणं, शिक्षा सुनावणं अशा दुर्दैवी गोष्टीही अवती-भोवती नियमित घडत असतात. पण पुण्यात झालेलं विशाल पोखरकर आणि आरजू तांबोळी यांचं लग्न मात्र या निराशेच्या वातावरणात दिलासा देणारं ठरलं. विशाल हिंदू... आरजू मुस्लीम... पण नातेवाईक आणि मित्रमंडळींच्या उपस्थितीत या दोघांनीही नोंदणी पद्धतीनं लग्न केलं.

 

लग्न म्हटलं की वधूवर आणि त्यांचे आई- वडील यांच्या इतकेच किंवा कदाचित जास्तच नातेवाईकही त्या निर्णयप्रक्रीयेचा भाग असतात. यांच्याबाबतीतही चित्र वेगळं नव्हतं.. मुलगा चांगला असावा एवढी एकच अपेक्षा आरजूच्या आईनं ठेवली असली, तरी आपल्या मुलीनं हिंदू मुलाशी लग्न ठरवलंय, हे नातेवाईकांना समजावणं तिच्यासाठी वाटतं तितकं सोपं नव्हतं. म्हणूनच आरजूच्या लग्नाचा आनंद असला तरी आपल्या मोठ्या मुलीला तिच्या सासरच्यांनी या लग्नाला येऊ दिलं नाही, त्याचं दुःखही या आईला आहे.

 

आरजू आयुर्वेदिक डॉक्टर आहे. त्यानंतर तिनं एमपीएससीची परिक्षा दिली. आता ती सेल्सटॅक्स ऑफिसर म्हणून काम करते. विशाल पुण्यात पत्रकारिता करतो. आरजूच्या आईला ऐकावा लागला तेवढा विरोध विशालच्या घरच्यांना मात्र नाही. कुठलाही धर्म आणि कुठलीही जात ही एकच आहे असं विशालचे वडील म्हणतात तेव्हा त्यांच्या समजुतदारपणाचं म्हणूनच कौतुक वाटतं.

 

अंधश्रद्धा निर्मूलन समिती, परिवर्तन मिश्र विवाह संस्था आणि मुस्लीम सत्यशोधक समाजानं विशाल आणि आरजूला या प्रवासात साथसोबत केली. बाबा आढाव, हमीद दाभोलकर, अन्वर राजन, शमसुद्दीन तांबोळी, रझिया पटेल या सगळ्यांनी या लग्नाला उपस्थित राहात विशाल आणि आरजूला शुभेच्छा दिल्या.

 

हिंदू आणि मुस्लीम या दोन धर्मांचं सहजीवन हे आपल्या देशात अनेक वर्ष चालत आलं आहे. पण हिंदू आणि मुस्लीम युवकांनी आपला सहचर समोरच्या धर्मात शोधण्याला मात्र म्हणावी तशी प्रेरणा आपल्या समाजात नाही. पण असं असलं तरी प्रेम, समता आणि मानवतेचा संदेश देणाऱ्या गौतम बुद्धांच्या जयंतीला झालेला आरजू आणि विशालचा थाटामाटात विवाह, हे समाज बदलाच्या दिशेनं टाकलेलं मोठं पाऊल आहे असं म्हणायला रकत नाही.