बीड : वादळी वाऱ्याने शेतात पडलेल्या विजेच्या तारेच्या स्पर्शाने आठ वन्य जीवांचा मृत्यू झालाय. बीड जिल्ह्यातील शिरुर तालुक्यातील नागऱ्याचीवाडी परिसरात ही घटना घडली.


बीड जिल्ह्यातील आष्टी, शिरुर परिसरात काल सायंकाळी मोठं वादळी वारं आलं होतं. या वादळी वाऱ्यात नागऱ्याचीवाडीत सिरसाट यांच्या शेतात वीज प्रवाह करणारी मुख्य तार शेतात पडली.

या तारेतून काल दुपारपासून आज दुपारपर्यंत वीज प्रवाह चालूच राहिल्याने रात्री जमिनीवर पडलेल्या तारेला चिटकून तीन मुंगूस, एक रानडुकर, काळवीट, साप, रानमांजर आणि खार अशा एकूण आठ वन्य प्राण्यांचा मृत्यू झाला.

जमिनीवर पडलेल्या तारेचा विद्युत प्रवाह वेळीच बंद केला असता, तर या वन्य प्राण्यांचा जीव वाचला असता. मात्र महावितरणच्या भोंगळ कारभाराचा फटका बिचाऱ्या मुक्या प्राण्यांना बसला आहे.