मुंबई : 2014 साली राष्ट्रवादीने आम्हाला धोका दिला त्यामुळेच आम्ही स्वबळाची भाषा करत आहोत, या काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या वक्तव्याचा समाचार घेताना राष्ट्रवादीचे प्रवक्ते नवाब मलिक म्हणाले की, "नाना पटोले पहिल्यांदा बोलतात, बातम्या सुरु होतात. परंतु ते त्यानंतर सांगतात की, माझ्या बोलण्याचा विपर्यास करण्यात आला. त्यामुळे आता ते काय बोलले हे मी ऐकलं नाही." अशी खोचक प्रतिक्रिया नवाब मलिक यांनी दिली. मागील काही दिवसांत नाना पटोले यांनी महाविकास आघाडी मध्ये नाराजी निर्माण होईल, अशी वक्तव्य केली होती. यावर शरद पवारांनी देखील खोचक प्रतिक्रिया दिली होती.


दरमान्य मागील काही दिवसांत प्रशांत किशोर यांनी राष्ट्रवादीचे प्रमुख शरद पवार यांची घेतलेली भेट आणि त्यानंतर दोन दिवसांपूर्वी राहुल गांधी प्रियांका गांधी यांची घेतलेली भेट याबाबत बोलताना माध्यमांमध्ये शरद पवार यांना राष्ट्रपती पदाचे उमेदवार घोषित करण्यासाठी प्रयत्न सुरु असल्याची चर्चा आहे. तसेच प्रशांत किशोर काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. या प्रश्नाला उत्तर देताना नवाब मलिक म्हणाले की, "राष्ट्रपती पदाची निवडणूक आता नाही. ज्या बातम्या येत आहेत त्या निराधार आहेत, खोट्या आहेत. त्याचा खुलासा आम्ही कालपण केला आहे. 5 राज्यांचा निकाल जो येईल त्याबरून सांगता येईल. शरद पवार यांच्या उमेदवारीबाबत पक्षांतंर्गत कधीच चर्चा झाली नाही. किंवा इतर पक्षांसोबत सुद्धा आमची कोणतीच चर्चा झाली नाही. प्रशांत किशोर शरद पवार यांना भेटले हे खरं आहे. परंतु ते इतर नेत्यांना कशासाठी भेटत आहेत हे माहिती नाही."


आज काँग्रेस पेट्रोल डिझेल दरवाढी विरोधात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांची सायकलवर जाऊन भेट घेणार आहेत याबाबत बोलताना नवाब मलिक म्हणाले की, "2014ची निवडणूक भाजपने पेट्रोल-डिझेलचा मुद्दा समोर करून 'अब की बार मोदी सरकार' अशी जाहिरातबाजी केली. परंतु भाजप सत्तेत आल्यानंतर सातत्याने भाववाढ थांबत नाहीय. महत्त्वाची बाब आंतरराष्ट्रीय भाववाढ कमी आहे तरीदेखील देशात भाववाढ कायम आहे. सध्या केवळ सरकारी तिजोरी भरण्याचं काम सुरू आहे. दरवर्षी 4 लाख कोटी रुपये हे सरकार लोकांच्या खिशातुन काढत आहे. बोलायचं एक आणि करायचं एक असं काम मोदी सरकार करत आहे. गॅस दरवाढ, डिझेल दरवाढ थांबायचं नाव घेत नाही. सीएनजीची देखील दरवाढ देखील सुरुच आहे. लोकांच्या लक्षात येणार नाही, अशा प्रकारे त्यांचा खिसा कापण्याचं काम मोदी सरकार करत आहे. महागाईमुळे लोकांचे बजेट हाताबाहेर गेलं आहे. त्यामुळे आमच्या पक्षाची देखील धरणे आंदोलने सुरु आहेत."


अनिल देशमुख यांच्या पत्नीला ईडीचं समन्स आलं आहे याबाबत बोलताना मलिक म्हणाले की, "भाजप केंद्रीय यंत्रणेचा दुरुपयोग करून महाविकास आघाडीतील नेत्यांना त्रास देण्याचा प्रयत्न करत आहे. लोकांना त्रास देणे, बदनाम करणे असं धोरण यांनी अवलंब आहे. देशमुख कुटुंबिय, खडसे कुटुंबीय यांच्या बाबत हेच घडलं आहे. लोकांच्या मनात भीती निर्माण करून सत्ता मिळवण्याचा त्यांचा प्रयत्न आहे. बंगालमध्ये तसंच केलं इतर पक्ष फोडून आपल्या पक्षात घेतलं परंतु सरकार आलं नाही. आता ज्यांना फोडलं होतं ते स्वतःच्या पक्षात जात आहेत. आता भाजपने त्यांचा झालेला गैरसमज दूर केला पाहिजे. आता कितीही यंत्रणांचा वापर केला तरी कोणीही त्यांना घाबरणार नाही."


महत्त्वाच्या इतर बातम्या :