कल्याण: कल्याण-डोंबिवली महापालिकेचे महापौर राजेंद्र देवळेकर यांना मुंबई उच्च न्यायालयाने मोठा दिलासा दिला आहे. निवडणूक रद्द करण्याचा सत्र न्यायालयाचा निर्णय हायकोर्टाने रद्द केला.


देवळेकर यांनी मागील दोन निवडणुकांमध्ये वेगवेगळ्या जातींची प्रमाणपत्र लावल्याचा आरोप करत प्रतिस्पर्धी भाजप उमेदवाराने न्यायालयात याचिका दाखल केली होती. यावरील सुनावणीत कल्याण सत्र न्यायालयानं त्यांची निवडणूकच रद्द केली होती, त्यामुळं महापौरांचं नगरसेवकपद रद्द झालं होतं.

मात्र या याचिकेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान दिल्यानंतर उच्च न्यायालयाने सत्र न्यायालयाचा निर्णय रद्द केला. त्यामुळे देवळेकर यांना मोठा दिलासा मिळाला आहे.

आज महापौर केडीएमसीत येताच शिवसैनिकांनी त्यांचं जल्लोषात स्वागत केलं. जे आपल्याला रणांगणात हरवू शकले नाहीत, ते आता अशा कुरबुरी करत असून त्यांना कधीही यश येणार नाही, असं म्हणत महापौर देवळेकर यांनी यावेळी विरोधकांवर पलटवार केला.

संबंधित बातमी

कडोंमपाचे महापौर राजेंद्र देवळेकरांचं नगरसेवकपद रद्द