सातारा: आजारपणाचं नाटक करुन रुग्णालयात दाखल झालेल्या आरोपींनी, जामीन मिळताच रुग्णालयातच लुंगी डान्स केल्याचा प्रकार साताऱ्यात घडला आहे.


तीन महिन्यापूर्वी आनेवाडी टोलनाक्यावरील वर्चस्व वादातून साताऱ्यातील दोन्ही राजे अर्थात खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्यात मध्यरात्री चांगलाच राडा झाला होता.

या राड्याप्रकरणी दोन्ही गटातील संशयितांना अटक करण्यात आली. मात्र त्यातील काहींनी छातीत दुखत असल्याचं कारण दिल्याने, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं.



दुसरीकडे त्यांच्या जामीनाची प्रक्रिया सुरु होती. जामीन मिळाल्याचं कळताच, या आरोपींनी रुग्णालयातच नाचकाम केलं.

आश्चर्य म्हणजे एकमेकांना मारहाण करणारे दोन्ही गटाचे कार्यकर्ते, जामीनाच्या बातमीने एकमेकांसोबत डान्स करु लागले.

काय आहे संपूर्ण प्रकरण?

आनेवाडी टोलनाक्यावरील वर्चस्व वादातून खासदार उदयनराजे भोसले आणि आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्यात तीन महिन्यांपूर्वी मध्यरात्री चांगलाच राडा झाला.

दोन्ही राजेंच्या समर्थकांमध्ये धुमश्चक्री होऊन, अनेक वाहनांची तोडफोड झाली. इतकंच नाही तर आमदार शिवेंद्रराजे भोसले यांच्या सुरुची बंगल्याजवळ गोळीबार झाल्यामुळे वाद चिघळला. खासदार उदयनराजे यांनी थेट शिवेंद्रराजे भोसलेंच्या बंगल्यात घुसण्याचा प्रयत्न केला.

त्यामुळे आमदार शिवेंद्रराजे भोसले समर्थकांनी उदयनराजे समर्थकांच्या सात गाड्या फोडल्या.

दोन्ही गटाचे आरोपी अटकेत

दरम्यान, या राड्यात वरिष्ठ पोलीस निरीक्षक किशोर धुमाळ यांनाही दुखापत झाली होती. त्यांच्या तक्रारीनंतर

आमदार शिवेंद्रराजे भोसले आणि खासदार उदयनराजे भोसले अशा दोन्ही गटाच्या कार्यकर्त्यांना अटक झाली होती. त्यांची रवानगी जिल्हा कारागृहात करण्यात आली होती.

आरोपींचं नाटक

दरम्यान, या आरोपींनी आजारपणाचं नाटक केल्याने त्यांना जिल्हा शासकीय रुग्णालयातील प्रिझन वॉर्डमध्ये दाखल करण्यात आलं.

दरम्यानच्या काळात काल त्यांच्या जामीनावर सुनावणी झाली. उच्च न्यायालयाने शिवेंद्रराजे भोसले गटाच्या सर्व 8 जणांना जामीन मंजूर केला. या निर्णयामुळे छातीत दुखणाऱ्या कैद्यांचा मूड पालटला.



त्यांनी थेट लुंगी डान्स गाण्यावर ठेका धरला. त्याला उदयनराजे गटाच्या आरोपी कार्यकर्त्यांनीही साथ दिली. एका गटाला जामीन मिळाला, आपल्यालाही मिळणार या खुशीत त्यांनी विरोधी गटात जाऊन डान्स केला.

काहींनी या डान्सचं शूटिंग करुन व्हिडीओ फॉरवर्ड केला. त्यामुळे हे प्रकरण उजेडात आलं. त्यामुळे पोलीस चौकशीच्या घेऱ्यात आले आहेत.

जामीन मिळालेल्या आरोपींची नावे

प्रताप क्षीरसागर, चेतन सोळंकी, निखील वाडकर, उत्तम कोळी, अनिकेत तपासे, हर्षल चिकणे, नितीन समोडमिसे, प्रतिक शिंदे

डान्स करताना दिसणारे आरोपी

आ शिवंद्रसिंहराजे भोसले गटाचे – नितीन सोडमिसे, प्रताप क्षीरसागर, उत्तम कोळी

खा. उदयनराजे भोसले गटाचे – बाळासाहेब ढेकणे, शेखर चव्हाण, विक्रम शेंडे, इम्तियाज बागवान

संबंधित बातम्या

शिवेंद्रराजेंच्या घरात घुसण्याचा उदयनराजेंचा प्रयत्न, मध्यरात्री राडा 

मी हातात बांगड्या भरल्या नाहीत, आ. शिवेंद्रराजेंचं खा. उदयनराजेंना खुलं आव्हान 

कुठेही पळा, अटक करणारच : IG विश्वास नांगरे- पाटील