सांगली : सांगलीत कृष्णा नदीतील पाण्याने इशारा पातळी ओलांडली आहे. आयर्विन पुलाजवळ 40.8 फुटांवर पाणी पातळी पोहोचली आहे. मुसळधार पावसामुळे नदीतील पाण्याची पातळी वाढत असल्याने पाणी धोका पातळीकडे जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्कतेचा इशारा दिला आहे. तर दुसऱ्या बाजूला चांदोली धरणातून पाण्याचा विसर्ग 20 हजार क्यूसेक्स करण्यात आला आहे. त्यामुळे वारणा नदीच्या पाणी पातळीतही आणखी वाढ झाली आहे.

कृष्णा, कोयना आणि चांदोली पाणलोट क्षेत्रात संततधार पाऊस अद्याप सुरुच आहे. तर कोयना आणि चांदोली धरणातून पाण्याचा विसर्ग करण्यात येत असल्याने कृष्णा आणि वारणा नद्यांच्या पाणी पातळीत झपाट्याने वाढ झाली आहे.

कृष्णा नदीच्या वाढलेल्या पाणीपातळीमुळे पलूस तालुक्यातील भिलवडी येथील कृष्णा नदीवरील पूल पाण्याखाली गेला आहे. त्यामुळे भिलवडी अंकलखोप मार्गावरील वाहतूक बंद झाली आहे, तर भिलवडीच्या बाजारपेठांमध्ये कृष्णा नदीचे पाणी शिरले आहे. याठिकाणी असणाऱ्या मौलाना नगर, वसंतदादानगर येथील सुमारे 50 कुटुंबांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात आले आहे.

औदुंबरमधील दत्त मंदिर पाण्याखाली गेलं आहे. तर वाळवा तालुक्यातील ताकारी येथील पूल कृष्णा नदीच्या वाढलेल्या पाणीपातळीमुळे वाहतुकीसाठी बंद करण्यात आला आहे. त्यामुळे ताकारी- बोरगाव मार्गावरील वाहतूक ठप्प झाली आहे. मिरज तालुक्यातील ढवळी येथे सुमारे पंधरा घरांना पुराच्या पाण्याचा वेढा पडलाय. या ठिकाणी असणाऱ्या नागरिकांना अन्यत्र हलविण्यात आले आहे. जवळच्याच ढवळी आणि म्हैसाळ गावचा नजीकच्या गावांशी संपर्क तुटला आहे.

व्हिडीओ पाहा



सांगलीमध्ये कृष्णा नदीने इशारा पातळी ओलांडली आहे. आयर्विन पूल याठिकाणी कृष्णा नदीची पाणीपातळी सकाळी 9.30 वाजता 40.8 फुटांवर पोहोचली होती. त्यामुळे सखल भागातील दत्तनगर, काकानगर, सूर्यवंशी प्लॉट येथील घरांमध्ये पुराचं पाणी शिरलं आहे. येथील आणखी 20 ते 25 कुटुंबांना पालिका प्रशासनाने सुरक्षित स्थळी हरवले आहे. आतापर्यंत सुमारे 70 कुटुंबांचे स्थलांतर पालिका प्रशासनाकडून करण्यात आले आहे. तरी या ठिकाणी असणारी घरे आता पुराच्या विळख्यात अडकली आहेत.

सांगलीच्या चांदोली धरण परिसरात अतिवृष्टी | एबीपी माझा



कोयना धरणातून सोडण्यात येणारे पाणी आणि कृष्णा पाणलोट क्षेत्रात सुरु असलेल्या संततधार पावसामुळे कृष्णा नदीच्या पाणी पातळीत आणखी वाढ होणार आहे. त्यामुळे धोक्याच्या पातळीकडे कृष्णा नदी जाईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे कृष्णा नदीकाठच्या गावांना प्रशासनाने सतर्क राहण्याचा इशारा दिला आहे.