पिंपरी चिंचवड : एकीकडे "मी फक्त भाजपचा नव्हे तर शिवसेनेचा ही मुख्यमंत्री," असं वक्तव्य देवेंद्र फडणवीस करत आहेत. तर दुसरीकडे जलसंपदा मंत्री तानाजी सावंत यांनी थेट भाजपलाच डिवचलं आहे. सत्तेचा माज असेल तर तो उतरवण्याची हिंमत शिवबंधनात असल्याचं सावंत म्हणाले. पिंपरी चिंचवडमध्ये भूम परांडा वाशी रहिवाशांच्या मेळाव्याचं आयोजन करण्यात आलं होतं. तिथे बोलताना हे आव्हान दिल्याने युतीत सर्व अलबेल नसल्याचं दिसून आलं.


खेकड्यांनी तिवरे धरण फोडलं, 'पुणे कालवाफुटीच्या थिअरी'ची जलसंधारण मंत्र्यांकडून पुनरावृत्ती

तानाजी सावंत काय म्हणाले?
"आज प्रत्येक क्षणाला सावध राहण्याची गरज आहे. आम्ही गाफिल नाही. जर कोणाला या सत्तेचा किंवा कोणत्या गोष्टीचा माज असेल, तो माज उतरवण्याची हिंमत सुद्धा आमच्या शिवबंधनात आहे. त्यामुळे आम्हाला धमक्या देण्याच्या भानगडीत पडायचं नाही," असं तानाजी सावंत म्हणाले. "एकला चलो रे अथवा युती ठेवायची की नाही हा सर्वस्वी निर्णय पक्षप्रमुख उद्धव ठाकरे घेतील," हे देखील स्पष्ट करायला तानाजी सावंत विसरले नाहीत. तर "उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीच नव्हे पंतप्रधान झालेलं ही मला आवडेल. पण हा निर्णय स्वतः पक्षप्रमुख घेतील," असंही सावंतांनी नमूद केलं.


मी भाजपचाच नाही शिवसेनेचाही मुख्यमंत्री : देवेंद्र फडणवीस
भाजप कार्यकारिणीच्या रविवारी (21 जुलै) झालेल्या बैठकीत कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करताना मुख्यमंत्री म्हणाले होते की, मुख्यमंत्रीपदाच्या वादात आपल्याला पडण्याचं कोणतंही कारण नाही. मुख्यमंत्री हा जनता निवडत असते. आपल्या मित्रपक्षांकडे खुमखुमी असणाऱ्या लोकांची कमी नाही. तरीदेखील मीच पुढचा मुख्यमंत्री असेन. मी आधीच सांगितलंय की, 'मी पुन्हा येईन, मग तुम्ही काळजी कशाला करता? मी केवळ भाजपचा मुख्यमंत्री नाही, शिवसेनेचाही मुख्यमंत्री मीच आहे. आरपीआय, रासप आणि शिवसंग्रामसह सर्व मित्रपक्षांचा मुख्यमंत्रीदेखील मीच आहे.

दरम्यान, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि राज्यभरातून आलेल्या शिवसेना पदाधिकाऱ्यांची काल (21 जुलै) 'मातोश्री'वर बैठक पार पडली. यात प्रत्येक विधानसभा मतदारसंघात स्वबळाची चाचपणी केल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. तसंच स्वबळावर लढायचं झाल्यास समोरचा उमेदवार कोण असेल, याचा आढावाही यावेळी घेतल्याचं समजतं.

तर भाजप कार्यकारिणीच्या बैठकीत विधानसभेच्या 288 जागांसाठी तयारी करण्याचे आदेश नेत्यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना दिले आहेत.