Maharashtra Rain : हवामान खात्यानं वर्तवलेल्या अंदाजानुसार महाराष्ट्रातील बहुतांश भागामध्ये शनिवारी जोरदार पावसानं हजेरी लावल्याचं पाहायला मिळालं. मंगळवारपासूनच सिंधुदुर्गासह राज्यातील तुरळक भागांत पावसानं हजेरी लावली होती. ज्यानंतर विदर्भाकडेही पावसानं आपला मोर्चा वळवल्याचं दिसून आलं. शनिवारी हिंगोली, वाशिम, चंद्रपूर या भागात वरुणराजा बरसला. मुंबईतही काही भागांत ढगाळ वातावरण दिसून आलं, तर काही ठिकाणी पावसाच्या सरी बरसल्या. 


हवामान खात्यानं दिलेल्या अंदाजानुसार वाशिम जिल्ह्यात शनिवारी रात्री 10 वाजल्यापासून विजांच्या कडकडाटासह पावसाला सुरुवात झाली. त्यामुळं वातावरणात मोठ्या प्रमाणात गारवा निर्माण झाला. असं असलं तरीही हा अवकाळी पाऊस जिल्ह्यातील नागरिकांच्या आरोग्यासाठी मात्र काहीसा धोकादायक ठरणार आहे. अशा प्रकारच्या वातावरणामुळे कोरोना संक्रमणाचा धोका वाढण्यास हातभार लागणार आहे. इतकंच नव्हे, तर शेतीलाही काही प्रमाणात नुकसान होणार आहे. आंबा, टरबूज, खरबूज, काकडी आणि फळभाजी पिकाला या पावसामुळं काही प्रमाणात फटका बसणार आहे. 


Rain | महाराष्ट्रातील काही भागांत वादळी वारे, ढगांच्या गडगडाटासह पावसाची शक्यता 


वीज पडून शेतकऱ्याचा मृत्यू 


वाशिमसह अमरावती, चंद्रपूर भागांतही शनिवारी जोरदार पावसाची उपस्थिती पाहायला मिळाली. तर, परभणीच्या काही भागात झालेल्या पावसामध्ये हिंगोली येथे वीज पडून एका शेतकऱ्याचा मृत्यू झाला. 


शनिवारी सायंकाळी 6 च्या सुमारास परभणीच्या पालम तालुक्यातील केरवाडी आणि परिसरात तसेच हिंगोली तालुक्यातील फाळेगाव, कनेरगाव नाका, सेनगाव तालुक्यातील कडोळी, हिंगोली शहरासह बासंबा, बळसोंड परिसरात काही वेळ अवकाळी पावसाने हजेरी लावली. कनेरगाव, फाळेगाव शिवारात सोसाट्याचा वाराही वाहत होता. सेनगाव तालुक्यातील वाघजाळी गावाच्या शिवारातील शेतात काढून ठेवलेले हळदीच्या पिकाचे नुकसान होऊ नये यासाठी शेतकरी लक्ष्मण नारायण तांबिले (४५) हे शेतात हळदीचे पिक झाकण्यासाठी गेले. या पिकावर ताडपत्री टाकत असताना त्यांच्या अंगावर वीज कोसळली आणि त्यांचा जागीच मृत्यू झाला. शेतात वीज पडल्याने मोठा आवाज झाला. त्यामुळे परिसरातील शेतकरी घटनास्थळाकडे धावले. त्या ठिकाणी तांबिले गंभीर जखमी अवस्थेत असल्याचे दिसून आले. त्यांना तातडीने उपचारासाठी रुग्णालयात नेत असताना वाटेतच त्यांचा मृत्यू झाला.


40 वर्षांत पहिल्यांदाच... 


आठवड्याभरात राज्यातील बहुतांश भागांत कमी- जास्त स्वरुपात पावसानं हजेरी लावली. तिथं कोकणातील काही भागांत एप्रिल महिन्यात पाऊस पडण्याची घटना अनेकांसाठीच नवी होती. मंगळवारी या भागात, वीजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस झाला. मागील काही दिवस उकाड्यानं हैराण झालेल्या आंबोलीकरांना यामुळं काहीसा दिलासा, मिळाला. मागील 40 वर्षांत आतापर्यंत एप्रिल महिन्यात आंबोलीत पहिल्यांदाच पाऊस पडला अशी माहिती स्थानिकांनी दिली.