मुंबई : शुक्रवारी रात्रीपासून महाराष्ट्रात कोरोना विषाणूच्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर वीकेंड लॉकडाऊनची सुरुवात झाल्याचं पाहायला मिळालं. नागरिकांनी या निर्देशांचं पालन करत घरात राहण्याला प्राधान्य दिलं. अशा परिस्थितीत सर्वांच्याच डोक्यावर कोरोनाचं संकट घोंगावत असताना अवकाळी पावसानं राज्यातील काही भागात हजेरी लावल्याचं दिसून आलं.
हवामान खात्याकडून वर्तवण्यात आलेल्या अंदाजानुसार 13 एप्रिलपर्यंत राज्यातील काही भागांत अवकाळी पाऊस हजेरी लावणार आहे. मुंबई आणि महाराष्ट्रातील काही भागात शनिवारी वरुणराजा अगदी अनपेक्षितपणे बरसून गेला.
IMD आयएमडीनं दिलेल्या माहितीनुसार बिहार आणि त्याला लागून असणाऱ्या पूर्व उत्तर प्रदेशच्या पट्ट्यात वादळी वारे तयार होत असल्याचं चित्र आहे. यासोबतच मध्य प्रदेश आणि या राज्याच्या खालच्या बाजूसही अशीच परिस्थिती उदभवली आहे. सदर परिस्थितीमुळे येत्या तीन दिवसांमध्ये अवकाळी पाऊस, ढगांचा गडगडाट, वादळी वारे आणि वीजा चमकण्याचीही शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे. पूर्व आणि मध्य भारतात याचे थेट परिणाम दिसून येणार आहेत.
महाराष्ट्रात विदर्भ, मराठवाडा या भागात 11 आणि 12 एप्रिल या दिवसांमध्ये पावसाची हजेरी असणार आहे. विदर्भातील काही भागात गारपीटीचाही इशारा देण्यात आला आहे. शनिवारी हवामान खात्याकडडून विदर्भासाठी ऑरेंज अलर्ट देण्यात आला होता. तर रविवार आणि सोमवार या दिवसांसाठी कोकण, गोवा, विदर्भ या भागांसाठी यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. दरम्यान, मुंबईतील हवामान अंशत: ढगाळ आणि कोरडं असेल. हवामानात होणाऱ्या या अनपेक्षित बदलांचा थेट परिणाम आरोग्यावरही दिसून येत आहे. त्यामुळं या आव्हानात्मक परिस्थितीत नागरिकांनी आरोग्याचीही काळजी घ्यावी असं आवाहन संबंधित यंत्रणांकडून करण्यात येत आहे.