मुंबई : कोरोनामुळे आधीच नुकसानीचा सामना करत असलेल्या शेतकऱ्यांना आता अस्मानी संकटाचा सामना करावा लागत आहे. राज्यात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झाल्याने शेतकऱ्यांचे कंबरडे मोडले आहे. आधीच कोरोनामुळे नुकसान सोसणाऱ्या शेतकऱ्याला ऐन पीकं काढणीच्या काळात पावसानं झोडपलं आहे. यामुळे काढणीला आलेल्या ज्वारी, गहू, हरभरा यासह अनेक पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.
धुळे जिल्ह्यातील साक्री, शिंदखेडा, शिरपूर तालुक्यात तुरळक पाऊस झाला आहे. पाऊस जरी कमी असला तरी वाऱ्याचं प्रमाण जास्त होतं,त्यामुळं जिल्हाभरात पिकांचं मोठं नुकसान झालं आहे.
ठाणे : शहापूर, भिवंडी परिसरात देखील पावसाने हजेरी लावली. शहापूर तालुक्यातील रसाळ, डोळखांब परिसरात पावसाच्या सरी काही वेळ आल्याने नागरिकांची तारांबळ उडाली.
अमरावती : अमरावती शहरात मुसळधार अवकाळी पावसाने नागरिकांची तारांबळ उडाली. पावसामुळे अनेक भागांची बत्ती गुल झाल्याने नागरिकांना त्रास सहन करावा लागला.
पुणे : पुण्यातील भीमाशंकर परिसरात गारपिटीसह अवकाळी पावसाने हजेरी लावली. या पावसामुळे परिसरातील शेतीचे मोठे नुकसान झाले. ही बाब कोरोनासाठी अनुकूल ठरण्याची भीती जाणकारांकडून व्यक्त केली जात आहे.
सोलापूर : सोलापूर जिल्ह्यात देखील वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली. बार्शी परिसरात या पावसामुळे ज्वारीसह अन्य पिकांचे मोठे नुकसान झाले आहे.
वाशिम : वाशिम जिल्ह्यात काही भागात आणि वाशिम शहरात अवकाळी पावसाने हजेरी लावली. मुसळधार पावसाने वाढत असलेल्या उन्हापासून काहीसा दिलासा मिळत असला तरी शेतकरी मात्र नुकसान झाल्याने हवालदिल झाला आहे. यवतमाळ जिल्ह्यात देखील अनेक ठिकाणी अवकाळी पाऊस झाल्याने नुकसान झाले आहे. तर हिंगोली जिल्ह्यात देखील अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पावसाने हजेरी लावली.
जालना शहरात आणि जिल्ह्यात देखील सर्वदूर पावसाने हजेरी लावली. पावसामुळे अनेक ठिकाणी काढणीला आलेलं पीक वाया जाण्याची शक्यता आहे. त्यामुळं जालन्यातील शेतकरी संकटात सापडला आहे.
सिंधुदुर्ग : सिंधुदुर्ग जिल्ह्यात अवकाळी पावसामुळे आंबा, काजू पिकांवर परिणाम झाला आहे. वादळी वाऱ्यासह आलेल्या पावसामुळे आंबा, काजूची फळगळ झाली आहे. कोरोनाचे सावट असताना शेतकऱ्यांचे अवकाळी पावसामुळे नुकसान सहन करावे लागले आहे.
परभणी: परभणी जिल्ह्यात अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. परभणी, मानवत, सेलुसह अनेक तालुक्यात पावसाने हजेरी लावली. विजांचा कडकडाट, वादळी वारे आणि पावसाने शेतीचे मोठे नुकसान झाले आहे.
रत्नागिरी : जिल्ह्यात ठिकठिकाणी अवकाळी पावसाने विजांचा कडकडाटासह जोरदार हजेरी लावली. काही ठिकाणी गारांचा पाऊस पडला. जिल्ह्यातील चिपळूण, गुहागर या भागांत पावसाने जवळपास तास भर जोरदार हजेरी लावली. या पडलेल्या पावसामुळे हवेत गारवा आला असून आंबा बागायतदाराना मोठा फटका बसला आहे. त्यामुळे आंबा बगायतदार मोठ्या चिंतेत पडले आहेत.
आज आणि उद्याही पावसाचा अंदाज
माहितीनुसार, बंगालच्या उपसागरावरून सध्या बाष्पयुक्त वाऱ्यांचा पुरवठा होतो आहे. मध्य भारतात कमी दाबाचा पट्टा कार्यरत झाला आहे. त्याचप्रमाणे महाराष्ट्रातही विविध ठिकाणी कमी दाबाचे क्षेत्र निर्माण झाले आहे. त्याचा परिणाम म्हणून गेल्या दोन ते तीन दिवसांपासून राज्यात पावसाची स्थिती आहे. दरम्यान, पुढील दोन दिवस राज्यात सर्वच ठिकाणी पावसाची शक्यता आहे. मराठवाडा, विदर्भासह मध्य महाराष्ट्रातही गारपीट होण्याची शक्यता आहे.
राज्यात शेतकऱ्यांवर अस्मानी संकट, वादळी वाऱ्यासह पावसाने मोठे नुकसान
एबीपी माझा वेब टीम
Updated at:
26 Mar 2020 07:03 AM (IST)
एकीकडे राज्य कोरोनाच्या संकटातून बाहेर पडण्याचा मार्ग शोधत आहे. तर दुसरीकडे अवकाळी पावसाने आपला कहर सुरु केला आहे. अवकाळी पावसाने राज्यात अनेक भागात हजेरी लावली. यामुळे शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे.
- - - - - - - - - Advertisement - - - - - - - - -