मुंबई : कोरोना, लॉकडाऊन आणि उन्हाळ्याचा उकाडा...या सर्व गोष्टी एकाच वेळी येऊन ठाकल्यामुळे आता ढगाकडे आशेनं पाहिलं जातंय. अशातच राज्यातील काही भागांमध्ये पावसाची सुरुवात झालेली आहे. सोमवारी पहाटे विजांच्या कडकडाटासह पाऊस झाल्यानं नागरिकांना दिलासा मिळाला. रविवारी कोकणासह पश्चिम महाराष्ट्रात मुसळधार पावसानं हजेरी लावली होती. तर सोमवारी पहाटे मुंबई, पुण्यात पावसाचं आगमन झालं आहे. गेल्या काही दिवसांपासून वाढणाऱ्या उष्णतेमुळे नागरिक हैराण झाले होते.
अरबी समुद्रात निर्माण झालेल्या कमी दाबाच्या क्षेत्रामुळे रविवारी रात्री राज्यात अनेक ठिकाणी वादळी पावसाने हजेरी लावली. परभणी, कोल्हापूर आणि साताऱ्यात मुसळधार पाऊस बरसला आहे. तर पिंपरी-चिंचवड परिसरात पावसाच्या तुरळक सरी जाणवल्या. सांगली जिल्ह्यात आज पहाटेपासून संततधार सुरू आहे. तर कोकणसह मुंबई आणि ठाण्यात तीन ते पाच जूनदरम्यान पावसाचं आगमन होईल असा अंदाज हवामान खात्याने वर्तवला आहे.
परभणी शहरासह जिल्ह्यात मान्सूनपूर्व पावसाने जोरदार हजेरी लावली असून सर्वत्र रात्रभर संततधार पाऊस सुरू होता. शिवाय पहाटेपासून अधून मधून पावसाच्या हलक्या सरी सुरू आहेत. यामुळे जिल्हावासीयांना उकाड्यापासून मात्र मोठा दिलासा मिळाला आहे. रात्री जिल्ह्यातील परभणी, मानवत, पाथरी,सेलु, गंगाखेडया तालुक्यात जोरदार वादळी वारे, विजांच्या गडगडाटासह पाऊस झाला. तर जिंतुर, पुर्णा, पालम या तीन तालुक्यात मध्यम स्वरूपाचा पाऊस झाला आहे, मात्र पहिल्याच पावसाने दमदार हजेरी लावल्याने मागच्या महिनाभरापासून जाणवणाऱ्या उकड्यापासून मात्र जिल्हावासीयांची मुक्तता झाली आहे.
Monsoon Update | तीन जूनपर्यंत महाराष्ट्रात चक्रीवादळ येण्याची शक्यता,8 जूननंतर महाराष्ट्रात मान्सून
लॉकडाऊन सुरू झाल्यापासून बळीराजा मोठं नुकसान पेलतोय, राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये शेतमाल बाजारात न गेल्याने किंवा त्याची विक्रीच न झाल्याने शेतकऱ्यांचं लाखोंचं नुकसान झालंय. केंद्र सरकारने काल, शनिवारी केलेल्या घोषणेनुसार बिगर कंटेन्मेंट झोनसाठी हा लॉकडाऊन अनलॉक 1.0 असा असेल, म्हणजेच यात हळूहळू काही क्षेत्रांना परवानगी दिली जाईल. त्यामुळे बाजारात पूर्वीपेक्षा जास्त शेतमाल विकला जाईल अशी अपेक्षा आहे. सोबतच पुन्हा आशा घेऊन उभं राहण्यासाठी पावसाळाच आता शेतकऱ्यांसाठी वरदान ठरू शकतोय.