अंबरनाथ : राज्यात अनेक शहरांमध्ये वाढत्या कोरोना बाधित रुग्णांमुळे रुग्णालये कमी पडू लागली आहे. ठाणे जिल्ह्यातील अंबरनाथ शहरात देखील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांच्या उपचारांसाठी जागाच उरलेली नाही. कारण शहरातल्या एकमेव कोविड स्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये सगळे बेड फुल झाले आहेत. इतर कुठलीही व्यवस्था पालिकेनं अद्याप उभारलेली नाही. त्यामुळे नव्याने दाखल होणाऱ्या कोरोना संक्रमित रुग्णांचे हाल होत आहे.


अंबरनाथ शहरात आत्तापर्यंत 165 कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले असून त्यापैकी 112 रुग्णांवर सध्या उपचार सुरू आहेत. या रुग्णांच्या उपचारांसाठी पालिकेनं सिटी हॉस्पिटल हे 60 बेडचं खासगी हॉस्पिटल ताब्यात घेतलं आहे. तिथली क्षमता संपल्यानं कोरोना संशयितांसाठी तयार करण्यात आलेल्या क्वॉरंटाईन सेंटरमध्ये रुग्णांना ठेवण्याची वेळ पालिकेवर आली होती. मात्र, आता तिथेही जागा संपल्यानं दररोज आढळणाऱ्या नव्या रुग्णांना ठेवायचं कुठे? असा प्रश्न पालिका प्रशासनाला पडला आहे. दुसरीकडे पालिकेकडून 500 बेड्सचं कोविड केअर सेंटर उभारण्याचं काम सुरू असलं, तरी ते ठेकेदार आणि अधिकाऱ्यांच्या निष्काळजीपणामुळे अतिशय संथगतीनं सुरू असल्यानं आता आपत्कालीन परिस्थितीत काय करावं? अशा पेचात पालिकेचे अधिकारी सापडले आहेत, अशी माहिती डॉ. धीरज चव्हाण, अतिरिक्त मुख्याधिकारी, अंबरनाथ नगरपरिषद यांनी दिली.

Lockdown 5.0 | राज्य सरकारची नियमावली जाहीर, कंटेनमेंट झोन वगळता अनेक निर्बंध शिथील

राज्यात कोरोना बाधितांचा संख्या वाढतेय
राज्यात आज कोरोनाच्या 2487 नवीन रुग्णांची नोंद झाली असून राज्यातील कोरोनाबाधितांची संख्या 67,655 वर गेली आहे. यापैकी सध्या राज्यात 36031अॅक्टिव्ह रुग्ण आहे. दरम्यान, आज राज्यात 89 कोरोनाबाधित रुग्णांचा मृत्यू झाला आहे. राज्यात आतापर्यंत 2286 जणांचा मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे आज 1248 रुग्णांना यशस्वी उपचारानंतर घरी सोडण्यात आलं आहे. आतापर्यंत 29,329 रुग्ण कोरोनामुक्त झाल्याची माहिती आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी दिली. आजपर्यंत पाठवण्यात आलेल्या 4 लाख 62 हजार 176 नमुन्यांपैकी 67655 जण पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 5 लाख 58 हजार 100 व्यक्ती घरगुती अलगीकरणात (होम क्वॉरंटाईन) असून 34 हजार 480 जण संस्थात्मक क्वॉरंटाईनमध्ये आहेत.

Unlock MAH Guidelines | राज्यात तीन जूनपासून अनलॉक! पाहा महाराष्ट्रात काय सुरू काय बंद असणार