मुंबई : राजधानी मुंबईसह उपनगरात आणि परिसरातील जिल्ह्यात पहाटेपासूनच पावसाने (Rain) दमदार हजेरी लावल्याने जिकडे तिकडे पाणीच पाणी अशी परिस्थिती पाहायला मिळत आहे. मुंबईसह (Mumbai) ठाणे, पालघर, रायगड, नवी मुंबई जिल्ह्यातही पावसामुळे नदी, नाले, बंधारे भरुन वाहत आहेत. तर, राज्यातील विविध जिल्ह्यात पावसामुळे धबधबे (Waterfall) ओसंडून वाहत आहे. त्यामुळे, पर्यटकांनीही या धबधब्याच्या निसर्ग सौंदर्याचा आनंद घेण्यासाठी गर्दी केल्याचं दिसून येत आहे. मात्र, अकोला जिल्ह्यातील पातूर तालूक्यातील धोधाणी येथील धबधब्यावर बुडून दोन युवकांचा मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. दुसरीकडे रायगड (Raigad) जिल्ह्यातील महाड-भोर वरंधा घाट 31 ऑगस्ट पर्यंत पूर्णपणे बंद ठेवण्याचे आदेशच जिल्हा प्रशासनाने लागू केले आहेत. त्यानुसार, या मार्गावर दगडं ठेऊन घाट बंद करण्यात आला आहे. 


मुंबई शहरासह उपनगरात आज सकाळपासूनच पावसाने दमदार हजेरी लावल्यान जनजीवन विस्कळीत झाले आहे. पावसामुळे रस्त्यांवर पाणीच पाणी झालं असून पाण्यातून मार्ग काढत वाहने व नागरिक प्रवास करतानाचे चित्र दिसत आहे. मुंबईसह उपनगर आणि कोकणताही मुसळधार वर्षाव सुरू आहे. रायगड जिल्ह्यातील अलिबागमध्ये रुग्णालयात पाणीच पाणी झालंय. 


ठाणे जिल्ह्यात सकाळपासून पावसाची बॅटिंग


ठाणे जिल्ह्यात सकाळपासून पावसाची जोरदार बॅटिंग पाहायला मिळाली, येथील ठिकठिकाणी रस्ते झालेत जलमय झाले आहेत. रस्त्यावरुन वाहन चालवताना वाहन चालकांची कसरत होत असून सतत पडणाऱ्या पावसामुळे नागरिकांचीही तारांबळ उडाली आहे. कल्याण डोंबिवली,उल्हासनगर,अंबरनाथ, बदलापूर परिसरात एक तासाभरापासून पावसाची संततधार सुरू आहे. कल्याण डोंबिवलीत काहीशी विश्रांती घेतलेल्यानंतर एक तासापासून पुन्हा पावसाने हजेरी लावली. रात्री 10 वाजल्यापासून पावसाची संततधार सुरू असून अधून मधून जोरदार सरी कोसळत आहेत. 


रायगडच्या अलिबाग येथील रुग्णालयात पाणीच-पाणी


रायगड जिल्ह्यात पावसाचे थैमान सुरू असून सकाळपासून सर्वत्रच धुवांधार पाऊस कोसळत आहे. पावसाचा जोर वाढल्याने अलिबाग येथील जिल्हा सरकारी रुग्णालयाच्या दुसऱ्या मजल्यावरील सर्जिकल वार्डमध्ये पाणीच पाणी साचले होते. त्यामुळे रुग्णांसह त्यांचे नातेवाईक आणि आरोग्य कर्मचाऱ्यांची तारांबळ उडाली. अलिबागच्या मुख्य रस्त्यावरही अशीच परिस्थिती दिसून आली, येथील अनेक रस्ते पाण्यात बुडाल्याने वाहनचालकांची तारांबळ उडल्याचे पाहायला मिळत आहे .


महाड-भोर-वरंधा घाट 31 ऑगस्टपर्यंत बंद


मागील काही दिवसापासून पावसाळी खबरदारी आणि दरडी कोसळण्याचा धोका असल्याने महाड-वरंधा भोर घाट प्रशासनाने बंद केला होता, तरीदेखील प्रवासी आपला जीव मुठीत घेऊन या घाटातून प्रवास करत होते. वरंधा घाटातील वाघजाई मंदिरा शेजारी असणाऱ्या एका वळणातील रस्ता खचल्याने पुणे जिल्हा प्रशासन आणि रायगड प्रशासनाने हा घाट बंद केला. मात्र, तरीदेखील प्रवासी आणि पर्यटक या घाटातून जीवघेणा प्रवास करीत असल्याचे उघड होताच रायगड  जिल्हा प्रशासनाकडून आता या घाटातून कोणतेच वाहन जाणार नाही याची पूर्ण जबाबदारी घेण्यात आली आहे. या घाटातील मध्य रस्त्यावर मोठा मोठाले दगड,आणि  बॅरिकेटिंग लावले आहेत.


सिंधुदुर्गात रेड अलर्ट


सिंधुदुर्गात उद्या हवामान विभागाने रेड अलर्ट जारी केला असून पुढील दोन दिवस ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. त्यामुळे, उद्या जिल्ह्यात मुसळधार ते अती मुसळधार पाऊस पडणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. आजही पावसाची संततधार सुरूच आहे. 


दापोलीत फांदी तुटून अपघात


दापोलीतील पोलीस लाईन समोर छोटे व्यापारी गाळे असलेल्या एका कटलरी व्यावसायिकाच्या दुकान खोक्यावर झाडाची भली मोठी फांदी कोसळली. दुपारी 2 वाजण्याच्या सुमारास ही घटना घडली असून खोकेमालक चंद्रकांत मुलुख आणि पादचारी बालंबाल बचावले. दरम्यान, दापोलीतही सकाळपासून पावसाचा जोर वाढल्याचं दिसून येतंय. 


गुहागरमध्ये तासाभरात पावसाचा कहर


मुसळधार पावसाचा गुवगर तालुक्यातील शृंगारतळी बाजारपेठेला तडाखा बसला आहे. येथील बाजारपेठ सर्वत्र पाणीच पाणी झाल्याने व्यापाऱ्यांची तारांबळ उडाली. गुहागर-चिपळूण महामार्गाला नदीचे स्वरूप आल्याने वाहन चालकांचीही कसरत झाल्याच दिसून आलं. दरम्यान, पुढील दोन दिवस जिल्ह्यात ऑरेंज अलर्ट असल्याने प्रशासनाकडून नागरिकांना खबरदारीच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत. 


धोधाणी धबधब्याजवळ 2 जण बुडाले


अकोला जिल्ह्याच्या पातूर तालूक्यातील धोधाणी येथील धबधब्यावर बुडून दोन युवकांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. हे दोन्ही युवक अकोल्याचे असून त्यांचा शोध सुरू आहे. शनिवार सुट्टीचा दिवस असल्याने धोधाणी धबधब्यावर पर्यटकांची गर्दी़ असते, त्यामुळे हे तरुणही पर्यटनाचा आनंद घेण्यासाठी येथे आले होते. 


पालघर जिल्ह्यातही नदी-नाले


पालघर जिल्ह्यात पहाटेपासूनच जोरदार पावसाची सुरुवात झाली असून आज दिवसभरच वर्षाव सुरू आहे. या पावसामुळे शेतकऱ्यांच्या भात लावण्या खोळंबल्या असून ठिक-ठिकाणी सकल भागात पाणी साचायला सुरुवात झाली आहे. दुसरीकडे नदी नाले ओसंडून व्हायला सुरुवात झाली असून सूर्या नदीला पूर आला आहे. हवामान खात्याकडून अजूनही पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. 


उजनी धरण उणे 34 टक्के भरले


राज्यात अनेक ठिकाणी पाऊस पडतोय, काही ठिकाणी पूर परिस्थिती निर्माण झाली आहे. परंतु नगर, सोलापूर आणि पुणे जिल्ह्याला वरदान ठरलेलं उजनी धरण उणे 34% आहे. मागच्या वर्षी देखील या दिवशी अशीच परिस्थिती होती. परंतु, धरण हे 13 जुलै  2022 रोजी धरण प्लसमध्ये आले होते. उजनी धरणाची साठवण क्षमता ही 117 tmc इतकी आहे. आता सध्या उजनी धरणात 45 tmc इतकार पाणी साठा आहे.