मुंबई : मुंबई शहरासह पूर्व आणि पश्चिम उपनगरात सलग दुसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस सुरुच आहे. याशिवाय ठाणे आणि पालघर जिल्ह्यालाही पावसाने अक्षरश: झोडपून काढलं आहे. कोकणातही मुसळधार पावसाने जनजीवन विस्कळीत झाले आहे. पावसामुळे काही सखल भागात पाणी साचलं आहे. तर पालघरमध्ये रेल्वे रुळावर पाणी साचल्याने लोकल वाहतूक बंद झाली आहे.


तिकडे कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगड जिल्ह्यात दमदार पाऊस सुरु आहे. नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली असून काही ठिकाणी बाजारपेठांमध्ये पाणी शिरलं आहे. रत्नागिरीत काही भागात वाऱ्यासह जोरदार पाऊस झाल्याने झाडं, विजेचे खांब कोसळून पडल्यामुळे विजेचा लपंडाव सुरू आहे.


मुंबईसह पूर्व आणि पश्चिम उपनगरात आजही मुसळधार पाऊस, अनेक भागात पाणी साचलं असून दृश्यमानता कमी झाली आहे. दादर, हिंदमाता परिसरात पावसाचा जोर वाढल्यामुळे रस्त्यावर पाणी साठायला सुरुवात, दादर ते लालबाग जाणा-या रस्त्यावरील वाहने अन्य मार्गाने वळवली आहे. पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांनी मुंबईतील हिंदमाता परिसरात जाऊन पाहणी केली. 2005 नंतर आज सर्वाधिक अतिवृष्टी झाली आहे. महापालिकेचे कर्मचारी रस्त्यावर असून त्यांचं काम सुरु आहे, असं आदित्य ठाकरे यांनी सांगितलं. तसंच गरजेशिवाय बाहेर पडू नका, असं आवाहनही त्यांनी केलं आहे.


कोल्हापूर-सांगलीला पुन्हा पुराचा धोका? पंचगंगा नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा


वसई विरार नालासोपाऱ्यात रात्रभर जोरदार पाऊस सुरु आहे. शहरातील सखल भागातील मुख्य रस्ते जलमय झाले असून, रस्त्यांना नदीचे स्वरुप आले आहे. नालासोपारा पूर्व सेंट्रल पार्क, नागीनदास पाडा, तुलिंज, आचोले, विरार पूर्व चंदनसार, पश्चिम विवा कॉलेज रोड, एम बी इस्टेट, वसई पश्चिम समता नगर, पार्वती क्रॉस रोड, सागरशेत, वसई पूर्व नवजीवन, सातीवली परिसरातील मुख्य रस्ते जलमय झाले आहेत. रात्रभर पडणाऱ्या पावसामुळे विजेचाही लपंडाव सुरु आहे. पावसाचा जोर अजूनही कायम आहे.


सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत
गेल्या दोन दिवसापासून कोसळणाऱ्या मुसळधार पावसामुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कणकवली मधील खारेपाटण मधून जाणाऱ्या सुख नदीला पूर आल्यामुळे या नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा प्रशासनाने दिला आहे, तर सुख नदीला पूर आल्यामुळे खारेपाटण बाजारपेठेमध्ये पाणी शिरलय. बांद्यातून वाहणारी तेरेखोल नदीलाही पूर आल्यामुळे आळवाडा तसेच बांदा बाजारपेठेतही पाणी घुसलं. तर कुडाळ तालुक्यातील भांनसाळ नदीला पूर आल्यामुळे अनेकांच्या घरांना पुराच्या पाण्याने वेढा दिला. पुराचे पाणी वस्तीमधे घूसून तळ्याचे स्वरूप आले आहे.


कुडाळ लक्ष्मीवाडी काळप नाका येथील घराला पाण्याने वेढा घातला होता. यावेळी घरात अडकलेल्या कांबळी कुटूंबातील पाच जनांना कुडाळ पोलीसांच्या रेस्क्यू टीमने बोटीच्या सहाय्याने सुखरूप बाहेर काढले. यावेळी तीन श्वानही या घरात अडकले होते त्यांनाही बाहेर काढण्यात यश आले आहे. वेंगुर्ले तालुक्यातील शिरोडा बाजारपेठेत पाणी आहे. जिल्ह्यात अनेक ठिकाणी झाड उन्मळून पडल्याने विद्युत पुरवठा खंडित झाला आहे. गेल्या चौवीस तासात जिल्ह्यातील दोन तालुक्यात पावसाने झोडपले आहे. यामध्ये दोडामार्ग तालुक्यात 279 मि.मी. तर वैभववाडी तालुक्यात 237 मी.मी. पावसाची नोंद झाली आहे. जिल्ह्यात सरासरी 151.4 मि.मी. पाऊस झाला असून आतापर्यंत एकूण सरासरी 2998.91 मि.मी. पावसाची नोंद झाली आहे.


मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक बंद
रत्नागिरी जिल्ह्यात मागील 40 तासांपासून जोरदार पाऊस कोसळत आहे. त्यामुळे आता नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली असून अनेक नद्या दूथडी भरून वाहत आहेत. दरम्यान, जिल्ह्यातील प्रमुख नद्यांसह सर्वच नद्यांना पूर आला आहे. मुसळधार पावसामुळे आता मुंबई - गोवा महामार्गावरील वाहतूक पूर्णता ठप्प झाली आहे. रत्नागिरी जिल्ह्यात मागील 24 तासात 180 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे. मुंबई-गोवा महामार्गावरील बावनदी, काजळी नदी, अर्जुना नदी यांना पूर आल्यानं आता महामार्गावरील वाहतूक बंद करण्यात आली आहे. या नद्यांवरील ब्रिज हे ब्रिटीशकालीन असल्यानं खबरदारीचा उपाय म्हणून हे पाऊल उचललं गेल्याचं संबंधित अधिकाऱ्यांनी सांगितले आहे. शिवाय, मुंबई-गोवा महामार्गावर सध्या काम सुरू असून लॅन्डस्लाईडचा धोका देखील होऊ शकतो. अशी माहिती देखील संबंधित अधिकाऱ्यांनी दिलीय. मुंबई-गोवा महामार्गावरील वाहतूक केव्हा सुरू होईल याबाबत मात्र अद्याप तरी अनिश्चितता आहे.


साताऱ्यातील शेतकरीवर्ग सुखावला
सातारा जिल्ह्यात मुसळधार पाऊस कोसळत असून गेल्या चोवीस तासांपासून पडत असलेल्या पाऊसामुळे शेतकरीवर्ग सुखावला आहे. सातारा जिल्ह्यात ऑगस्ट उजाडलातरी म्हणाव असा पाऊस पडला नाही, त्यामुळे कोणतेच धरण पुर्णक्षमतेने भरले नाही. मात्र, गेल्या दोन दिवसापासून सातारा जिल्ह्यातील अनेक भागात मुसळधार पाऊसाची नोंद पहायला मिळत आहे. या मध्ये कोयना आणि महाबळेश्वरात तर विक्रमी पाऊसाचीनोंद पहायला मिळाली.


बेळगाव
दोन दिवसांपासून पावसाची रिपरिप सुरू असून रात्रीपासून पावसाने चांगला जोर धरला आहे.सोसाट्याचा वारा वाहत असून पाऊसही मुसळधार सुरू आहे. मार्कंडेय नदीचे पावसामुळे पात्र विस्तारले असून नदीकाठच्या जमिनीतील पिके पाण्याखाली गेली आहेत. शहरातील सखल भागात रस्त्यावर पाणी आले होते. खानापूरच्या मलप्रभा नदीच्या पाणी पातळीत मोठी वाढ झाली आहे. मलप्रभा नदीवरील पुलावरून पाणी वाहू लागले आहे. गेल्या चोवीस तासात 72 मिमी पाऊस झाला आहे. तालुक्यातील अनेक ठिकाणी रस्त्यावर पाणी आल्यामुळे संपर्क तुटला आहे. शास्त्रीनगर, महात्मा गांधी कॉलनी या भागात घरात पावसाचे पाणी शिरले आहे. पावसामुळे बेळगाव शहरात अनेक ठिकाणी झाडे पडल्याच्या आणि घराच्या भिंती पडण्याच्या घटना घडल्या आहेत.


Mumbai Rains | हिंदमाता परिसर पुन्हा जलमय, मुंबईतील अनेक सखल भागात पावसाचं पाणी