मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये आजही अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याने दिला आहे. मुंबईबरोबरच रायगड आणि पालघरमध्येही अतिवृष्टी होणार असल्याची माहिती हवामान खात्याने दिली आहे. मुंबई शहर आणि उपनगरांमध्ये पावसाची संततधार सुरुच आहे. तर, मुंबईत आजपर्यंतचा सर्वाधिक आणि विक्रमी पाऊस यंदाच्या मोसमात झाला आहे. 2011 मध्ये झालेल्या एकूण 3 हजार मिमी पावसाचा विक्रम मोडत कालच्या (8 सप्टेंबर) रविवारपर्यंत मुंबईत एकूण 3 हजार 286 मिमी पावसाची नोंद झाली आहे.


खबरदारी म्हणून ग्रामस्थ आणि जनावरांचं स्थलांतर
कोल्हापूर जिल्ह्यात पावसाचा जोर अद्याप कायम आहे. पंचगंगा नदीच्या पाणीपातळीत वाढ झाल्याने इशारा पातळीकडे वाटचाल सुरु आहे. संभाव्य धोका ओळखून चिखली गावातल्या ग्रामस्थांनी आपली जनावरे सुरक्षित स्थळी हलवण्यासाठी सुरुवात केली आहे. ग्रामस्थांनीही स्थलांतर करण्याचा निर्णय घेतला आहे. गगनबावडा तालुक्यात सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. संभाव्य पुराचा धोका ओळखून प्रशासनाने दोन दिवसांपूर्वीच एनडीआरएफची तीन पथके कोल्हापुरातील विविध भागात तैनात केली आहेत.

अलमट्टी धरणातून विसर्ग वाढवला
कोल्हापूरवर पुराचं संकट घोंगावत असताना , कर्नाटक सरकारने अलमट्टी धरणातून विसर्ग वाढवला आहे. त्यामुळे कोल्हापुरातल्या पंचगंगेची पातळी नियंत्रीत राहण्यात मदत होणार आहे. कोल्हापूर आणि सांगलीत पावसाचा वाढलेला जोर पाहता मुख्यमंत्री देवेंद्र फडवीस यांनी कर्नाटक सरकारला अलमट्टीमधून विसर्ग वाढवण्याची विनंती केली होती. त्यानंतर अलमट्टीमधून होणार विसर्ग 50 हजार क्युसेकने वाढवला आहे.

सांगलीत एनडीआरएफची पथकं तैनात
साताऱ्यातही येत्या तीन दिवसात अतिमुसळधार पावसाचा इशारा हवामान विभागाने दिला आहे. सातारा आणि सांगली जिल्ह्यात पावसाची संततधार सुरु आहे. कोयना धरणातून वाढलेला विसर्ग पाहता कृष्णा नदीची पाणीपातळी 34 ते 35 फुटांपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. खबरदारीचा उपाय म्हणून सांगलीत एनडीआरएफच्या दोन पथकांना पाचारण करण्यात आलं आहे.

महाबळेश्वरने चेरापुंजीला मागे टाकलं
महाराष्ट्रातील प्रसिद्ध थंड हवेचं ठिकाण असलेल्या महाबळेश्वरने यंदा पावसाचे विक्रम मोडले आहेत. महाबळेश्वरने चेरापुंजीसह मौसिनरामलाही मागे टाकलं आहे. आतापर्यंत महाबळेश्वरमध्ये तब्बल 300 इंच पावसाची नोंद झाली आहे. 1 जून ते 4 सप्टेंबर या कालावधीत चेरापुंजीत 240 इंच पाऊस झाला आहे तर मौसिनराम इथे 245 इंच पावसाची नोंद झाली आहे.

गडचिरोलीत 300 गावांचा संपर्क तुटला
गेल्या तीन दिवसांपासून सुरु असलेल्या मुसळधार पावसामुळे गडचिरोलीतल्या भामरागडमध्ये पूरस्थिती निर्माण झाली आहे. पुराचा सर्वात मोठा फटका भामरागड तालुक्याला बसला आहे. भामरागडचा जवळपास 70 टक्के भाग पुराच्या पाण्याने वेढला आहे. तर 300 गावांचा संपर्क तुटला आहे. पुरामुळे गेल्या तीन दिवसांत तीन जणांचा मृत्यू झाला आहे. अहेरी तालुक्यात नाला ओलांडताना 25 जनावरांचा मृत्यू झाला आहे.

वर्ध्यात तलावाच्या मुख्य भिंतीला भेगा
वर्धा जिल्ह्यातल्या आर्वी तालुक्यातील बाऱ्हा गावातल्या तलावाच्या मुख्य भिंतीला भेगा पडल्याची घटना समोर आली आहे. त्यामुळे स्थानिकांसह परिसरात एकच खळबळ निर्माण झाली आहे. खबरदारीचा उपाय म्हणून बाऱ्हा गावातील 42 कुटुंबातील 150 जणांना स्थलांतर करण्यात आलं आहे. सततच्या पावसामुळे हे तलाव सध्या पूर्ण क्षमतेने भरलं आहे. तर पाटबंधारे विभागाकडून या तलावाची योग्य देखभाल केली जात नसल्याचा आरोप स्थानिकांनी केला आहे.