नागपूर : विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन यंदा खास नागपुरात घेण्यात येत आहे. मात्र, रात्रीपासून झालेल्या मुसळधार पावसाने अधिवेशनाचा आजचा दिवस पाण्यात गेल्याचं पाहायाला मिळालं. कारण, साचलेल्या पाण्यामुळे विधीमंडळ परिसराला तळ्याचं स्वरुप प्राप्त झालं.

त्याचबरोबर विधानभवनातील बत्तीही काहीकाळ गुल झाली. परिणामी विधीमंडळाचं आजचं कामकाज रद्द करण्यात आलं.

आकडेवारी पाहता नागपुरात 24 तासात 61.7 मिमी पाऊस झालाय. तर गेल्या तीन तासात तब्बल 162.7 मिमी एवढ्या पावसाची नोंद झाली आहे. तर येत्या 24 तासात हवामान विभागाने नागपुरात अतिवृष्टीचा इशारा दिला आहे.

दरम्यान, सकाळपासून झालेल्या पावसामुळे नागपूर शहरातील अनेक भागात पूरस्थिती निर्माण झाली आहे. नागपूर विमानतळावरही पाणी साचलं आहे. विमानतळाकडे जाणाऱ्या रस्त्यांवरही मोठ्या प्रमाणात पाणी आहे. तर उद्या नागपुरातील सर्व शाळांना सुट्टी देण्यात येत असल्याची घोषणा जिल्हाधिकाऱ्यांनी केली.

चंद्रपूर जिल्ह्याला पावसाचा तडाखा, मोठं नुकसान

चंद्रपूर जिल्ह्याला आज सकाळपासून पावसाचा मोठा तडाखा बसला. चंद्रपूर जिल्ह्यात काल रात्रीपासून संततधार पावसाला सुरुवात झाली होती, मात्र आज सकाळपासून पावसाने मुसळधार बरसायला सुरुवात केली आणि यामुळे जिल्ह्याला पावसाचा मोठा तडाखा बसला.

मुसळधार पावसामुळे शेकडो घरांमध्ये पाणी शिरल्याने लोकांचे मोठे आर्थिक नुकसान झाले आहे. मुसळधार पावसामुळे जिल्ह्यातील सर्वच नदीनाले दुथडी भरून वाहत आहेत. या पावसामुळे वरोरा-चिमूर मार्गावरील बेंबाळ येथे पुलाला मोठे भगदाड पडले आहे. चौपदरीकरण होत असलेल्या वरोरा-चिमूर मार्गावर बेंबाळ येथे हा पूल बांधण्यात येत होता. मात्र आज सकाळी पावसाच्या तडाख्यामुळे पुलाला मोठे भगदाड पडले आणि मोठ्या प्रमाणात रस्ता खचून गेला. सध्या चिमूर ते वरोरा ही वाहतूक पूर्ण पणे बंद करण्यात आली आहे.

दुसऱ्या एका घटनेत याच चिमूर-वरोरा मार्गावर एसटी महामंडळाची एक बस रस्त्यावरील पाण्याचा अंदाज न आल्याने रस्त्याच्या खाली उतरली. चिमूरकडून चंद्रपूरला येत असलेल्या या बसला बोथली येथे रस्त्यावरील पाण्याचा अंदाज आला नाही आणि बस रस्त्याच्या खाली उतरली. या बसमध्ये अंदाजे 50 प्रवासी होते, मात्र सुदैवाने कोणालाही इजा झाली नाही.

या पावसामुळे पोंभुर्णा तालुक्यात वैनगंगा नदीत एक शेतकरी वाहून गेला असून त्याचा शोध घेण्याचं काम सुरु आहे. घाटकूळ परिसरात विनोद बोडेकर हा 34 वर्षीय शेतकरी आपल्या तीन मित्रांसोबत नदीतील मोटारीचे पाईप काढायला गेला होता. मात्र अचानक वैनगंगा नदीतील पाणी वाढल्याने हे चौघही नदीत वाहू लागले. यातील तिघे जण कसेबसे किनाऱ्यावर पोहोचले, मात्र विनोद बोडेकर हा नदीच्या पाण्यात वाहून गेला. पाण्यात वाहून गेलेल्या या शेतकऱ्याचा शोध सुरु आहे.

नदी-नाल्यांना अचानक आलेल्या या पुरामुळे  पोथरा नदीच्या पुरात अडकलेल्या 11 मजुरांना वाचवण्यात आले आहे. चंद्रपूर आणि वर्धा जिल्ह्यांच्या सीमेवर असलेल्या खांबाडा गावाशेजारी पॉवरग्रीडचे टॉवर उभारणीचे काम सुरु आहे. या कामात असलेले 40 ते 50 परराज्यातील मजूर पोथरा नदीच्या शेजारी असलेल्या शेतात गेले होते. मात्र अचानक नदीला पूर आल्याने हे 10 ते 11 मजूर तिथेच अडकून पडले. अखेर जिल्हा प्रशासनाने बोटींच्या मदतीने या मजुरांना बाहेर काढले.

विदर्भातील जवळपास सर्वच जिल्ह्यांमध्ये पाऊस सुरु आहे. मात्र याचा सर्वाधिक फटका नागपूर शहर आणि चंद्रपूर जिल्ह्याला बसला आहे. नागपुरात तर अक्षरशः पाण्यातून वाट काढून नागरिकांना चालावं लागत होतं. शाळकरी विद्यार्थ्यांचेही यामुळे मोठे हाल झाले.