औरंगाबाद : अवकाळी पावसाने झालेल्या नुकसानीची पाहणी करण्यासाठी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आज औरंगाबाद दौऱ्यावर होते. शेतकऱ्यांना सरकारने जाहीर केलेली मदत तुटपुंजी आहे. सरकारने शेतकऱ्यांना तातडीने प्रति हेक्टर 25 हजार रुपये मदत जाहीर करावी, अशी मागणी यावेळी उद्धव ठाकरेंनी केली.


शेतकऱ्यांना अवकाळी पावसामुळे प्रचंड नुकसान झालं आहे. राज्य सरकार अपूरं पडत असेल तर केंद्र सरकारने पुढे येऊन मदत केली पाहिजे. मोदी सरकारने शेतकऱ्याला तातडीने मदत दिली पाहिजे. सरकारने जाहीर केलेली 10 हजार कोटींची मदत पुरेशी नाही. शेतकऱ्याला तातडीने हेक्टरी 25 हजार रुपये मदत दिली पाहिजे. यामध्ये शेतकऱ्यांना कोणत्याही अटी नसाव्यात, अशी मागणी उद्धव ठाकरेंनी केली.


लवकरच राज्यातील इतर भागातील शेतकऱ्यांचीही भेट घेणार असल्याचं उद्धव ठाकरेंनी सांगितलं. शिवसेना शेतकऱ्यांच्या पाठिशी आहे. यावेळी उद्धव ठाकरेंनी विधानसभा निवडणुकीत महायुतीला दिलेल्या पाठिंब्याबद्दल औरंगाबादकरांचेही आभार मानले. मात्र अशा परिस्थिती यावं लागेल, याचं दु:ख आहे, असं उद्धव ठाकरेंनी म्हटलं.


सरकारकडून 10 हजार कोटींच्या मदतीचे निर्देश प्रशासनाला दिले असल्याची माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल दिली. अवकाळी पावसातील नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना सरकारकडून 10 हजार कोटींची मदत करणार असल्याचे ते म्हणाले. प्रशासनाकडून पंचनामा न होऊ शकल्यास शेतकऱ्यांनी नुकसानीचा फोटो काढून जरी पाठवला तरी ग्राह्य धतले जाईल. मदतीचे पैसे थेट शेतकऱ्यांच्या खात्यात जमा केले जाणार आहे, असंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.