औरंगाबाद : मराठवाड्यात जवळपास सर्वच जिल्ह्यांत पावसाने जोरदार हजेरी लावली आहे. अनेक जिल्ह्यातील नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. सतत पडणाऱ्या पावसामुळे अनेक ठिकाणी पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे.


उस्मानाबाद जिल्ह्यात आज सर्वत्र मुसळधार ते मध्यम पावसाची नोंद होत आहे. कालपासून संततधार पाऊस सूरु असून आठ मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. उमरगा तालुक्यातील ओढ्यांना पाणी आले आहे. मूग-उडीद सोयाबीन काढण्याच्या वेळी पाऊस आल्याने पिकांचे नुकसान होणार आहे. परभणीतही सलग तिसऱ्या दिवशी मुसळधार पाऊस सुरु आहे. त्यामुळे अनेक ओढे नाले ओसंडून वाहत आहेत.


हिंगोलीत आज सलग दुसऱ्या दिवशी पावसाची बॅटिंग सुरु आहे. हिंगोलीहून विदर्भाला जोडणाऱ्या राज्यमार्गावरील सोनगाव रोडवर असलेल्या गोमती नदीला पूर आल्यामुळे पर्यायी उभारलेल्या पुलावरुन पुराचे पाणी जात असल्याने, मागील काही तासापासून वाहतूक ठप्प झाली आहे.  ग्रामीण भागातही पावसाने दमदार हजेरी लावली. त्यामुळे पुन्हा एकदा नदी नाले तुडूंब भरून वाहत आहे. नांदेड जिल्ह्यातही गेल्या तीन दिवस सतत पाऊस पडत असल्यामुळे पूर सदृश्य परिस्थिती निर्माण झाली आहे.


लातूर जिल्ह्यात आज सकाळी 9 ते 12 या तीन तासात पावसाने जोरदार हजेरी लावली. जिल्ह्यातील निलंगा तालुक्यातील माकनी थोर आणि आजूबाजूच्या गावात पावसाने तीन तासात संपूर्ण चित्र पालटून टाकलं. यामुळे काढणीला आलेला सोयाबीन, ज्वारी आणि ऊस पिकाचे नुकसान झाले आहे. जोरदार पावसाने उभी पीकं आडवी झाली. अनेक ठिकाणी पावसामुळे पिकं वाहून गेली आहेत. माकनी थोर, हंगरगा, सिर्शी या मोठ्या गावाच्या शिवारात नुकसान अधिक आहे.