कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात जूनच्या सुरुवातीपासून पावसानं जोर धरला आहे. त्यामुळे पूर्वानुभव पाहता आता जिल्हा प्रशासनाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे. जूनच्या 15 तारखेपर्यंत पंचगंगा नदीच्या पाणी पातळीत इतकी वाढ होण्याची ही कदाचित पहिलीच वेळ असेल.


गेल्यावर्षी आलेल्या महापुरामुळे आता कोल्हापूरकरांची ताक देखील फुकून पिण्यासारखी अवस्था झाली आहे. कारण कोल्हापूर जिल्ह्याच्या धरण क्षेत्रात पावसाचा जोर वाढला असून दोन दिवसात पंचगंगेच्या पाणी पातळीत 15 फुटांनी वाढ झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यातील 27 बंधारे पाण्याखाली गेले आहेत. तर दोन मार्गावरची वाहतूक वळवण्यात आली आहे. पावसाचा जोर वाढल्याने जिल्हा प्रशासनाने नदी काठावर असलेल्या गावांना नोटीस पाठवून सतर्क राहण्याचं आवाहन केलं आहे.


गेल्यावर्षी आलेल्या पुरामुळे जिल्हा प्रशासनाने यंदा 15 जूनला एनडीआरएफच्या तुकड्या कोल्हापुरात येण्यासाठी प्रयत्न केले. पण एनडीआरएफचे जवान 15 जुलैला येणार असल्याची माहिती मिळत आहे. महापुरात अचानक वाढलेल्या पाणीपातळीमुळे एनडीआरएफ जवानांना देखील कोल्हापुरात येताना अडचण आली होती. त्यामुळे पुन्हा तसं घडू नये, यासाठी आतापासूनच प्रयत्न करणं गरजेचं आहे.


पूरस्थिती टाळण्यासाठी कर्नाटकसोबत मुख्यमंत्रीस्तरावर बैठक घ्या, देवेंद्र फडणवीस यांचे मुख्यमंत्र्यांना पत्र


गेल्यावर्षी आजपर्यंत 48 मिमी पावसाची नोंद झाली होती. मात्र यंदा 1 जूनपासून आतापर्यंत 239 मिमी पावसाची नोंद झाली आहे. यावरून जूनच्या सुरुवातीला किती जोरदार पाऊस झालाय याचा अंदाज लावू शकतो. आतापर्यंतचा अनुभव एनडीआरएफ टीम आतापर्यंत दाखल होत गरजेचं होतं. पण या टीम 15 जुलैला येणार असल्याचे सांगण्यात येत आहे.


कोरोनानंतर महापुराचा सामना करण्याची वेळ प्रशासकीय यंत्रणावर येऊ शकते. त्यामुळे ज्या गावात जिल्हाप्रशासनाने आधीच नोटीस पाठवल्या आहेत, त्यांनी सहकार्य करून वेळीच निर्णय घेणे गरजेचे आहे. कारण निसर्गासमोर कुणाचं काही चालत नाही हे आपण आधीही पाहिलं आहे.


Kolhapur Rains | कोल्हापुरात पावसाचा जोर वाढला; नदीच्या पाणीपातळीत वाढ