मुंबई : काल सकाळपासून मुंबईत बरसत असलेला पाऊस अजूनही सुरुच आहे. जोरदार पावसामुळं मुंबईतल्या हिंदमाता, दादर, सायनच्या सखल भागात काही काळ पाणी साचलं होतं. त्यामुळं वाहनचालकांना वाहतूककोंडीचा सामना करावा लागला. दरम्यान, येत्या 24 तासात मुंबईसह कोकणासह महाराष्ट्रात जोरदार पावसाचा इशारा हवामान खात्यानं दिला आहे.


पावसामुळे मध्य आणि हार्बर मार्गावरील वाहतूक 10 ते 15 मिनिटं उशिरानं सुरु आहे. पश्चिम रेल्वेची वाहतूक सध्या सुरळीतपणे आहे.  अद्याप या पावसाचा लोकल वाहतुकीला फटका बसला नाही.

नवी मुंबई, पनवेल भागात मुसळधार पाऊस
नवी मुंबई , पनवेल भागात रात्रीपासून जोरदार पाऊस बरसत आहे. शहरातील ऐरोली, कोपरखैरणे , वाशी, पनवेल भागात पावसाने जोरदार बॅटिंग करायला सुरुवात केल्याने सकाळी कामावर जाणाऱ्या चाकरमान्यांना याचा चांगलाच त्रास सहन करावा लागला आहे. मुसळधार पावसामुळे कोपरखैरणे, नेरूळ, कळंबोली येथील हायवेला असणाऱ्या सबवेमध्ये पाणी साचल्याने वाहनधारकांना त्यातून वाट काढत जावी लागत आहे.

भिवंडीत 2 दिवसांपासून सुरु असलेल्या संततधार पावसामुळे कामवारी नदीची पाणी पातळी वाढली आहे. शहरातल्या अनेक सखल भागात पाणी साचलं आहे. भिवंडी-वाडा राज्य मार्गावरच्या शेलार गावातही 2 ते 3 फुटापर्यंत पाणी साचलं होतं. अनेक घरांत आणि दुकानात पाणी शिरल्यानं नागरिकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे. दरम्यान, कामवारी नदीकाठच्या लोकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.

दुसरीकडे साताऱ्यात कोयणा, महाबळेश्वरमध्ये मुसळधार पाऊस सुरु आहे. कोयना धरणात येणाऱ्या पाण्याची आवक वाढलीय. त्यामुळे धरणाचे दरवाजे 2 फुटांवरुन 3 फुटांवर उचलण्यात आलेत. सध्या धरणातून 30 हजार क्यूसेकने पाण्याचा विसर्ग सुरु आहे. कोयनेत सध्या 104. 5 टीएमसी पाणीसाठा आहे.

पालघर जिल्ह्यात पावसाची संततधार कायम असून काही भागात मुसळधार पाऊस सुरू आहे.  पालघर बोईसर रोडवर सरावली येथे पाणी भरले आहे. तर वाणगाव भागातही रस्त्यावर पाणी आलं असून काही ठिकाणी सकल भागात पाणी साचले आहे. नदी नाल्यांनाही पूर यायला सुरुवात झाली आहे.  वाणगाव डहाणू रोडवर पाणी आल्याने वाहतूक बंद झाला आहे तर बोईसर चिल्हार रोडवर बेटेगाव येथे पाणी आल्याने रस्ता बंद आहे.

गणेश मंडळांना पावसाच्या वेळी वीजपुरवठा खंडित करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. बृहन्मुंबई गणेशोत्सव समन्वय समितीकडून गणपती मंडळांना सूचना देण्यात आल्या आहेत.   मनुष्यहानी टाळण्यासाठी या सूचना केल्या असल्याची माहिती बृहन्मुंबई सार्वजनिक गणेशोत्सव समन्वय समिती अध्यक्ष अॅड.नरेश दहिबावकर यांनी दिली आहे.
मंडपात पाणी शिरल्यास महापालिका कर्मचाऱ्यांना संपर्क करण्याच्या सूचना दिल्या आहेत.