महाराष्ट्रात उष्णतेची लाट, उष्माघाताचे पाच बळी
एबीपी माझा वेब टीम | 30 Mar 2017 06:09 PM (IST)
मुंबई : राज्यात उन्हाचा कडाका चांगलाच वाढला आहे. मराठवाडा आणि विदर्भात सूर्यनारायण अक्षरश: आग ओकत आहे. महाराष्ट्रातल्या 24 जिल्ह्यात तापमान 40 अंशाच्या वर गेलं असून उष्माघातामुळे आतापर्यंत पाच जणांचा जीव गेला आहे. नाशिकमध्ये 40.3 अंश सेल्सिअस इतकं तापमान नोंदवण्यात आलं आहे, तर विदर्भातही उष्णतेची लाट पसरली आहे. वाशिम जिल्हा सोडून इतर सर्व जिल्ह्यांमध्ये गेल्या दहा वर्षातील मार्च महिन्यातलं सर्वाधिक तापमान नोंदवण्यात आलं आहे. नागपुरात 42 अंश सेल्सिअस तर वर्ध्यात 42.8 अंश सेल्सिअस इतक्या तापमानाची नोंद करण्यात आली आहे. उत्तर महाराष्ट्रातही अलर्ट जारी करण्यात आला असून दुपारी 12 ते 3 या दरम्यान नागरिकांना घराबाहेर न पडण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.