परभणी/नांदेड : अवकाळी पाऊस आणि गारपिटीतून शेतकरी सावरत नाहीत, तोवरच नांदेड आणि परभणी आणि वाशिम जिल्ह्यातील काही भागात पुन्हा एकदा वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. परभणी जिल्ह्यात पूर्णा तालुक्यातील गारपिटीमध्ये एका महिलेचा मृत्यू झाला आहे.
परभणी जिल्ह्यातील पूर्णा शहर आणि तालुक्यात वादळी वाऱ्यासह गारपीट झाली. पूर्णा तालुक्यातील चुडावा, गौर, नरापूर, भाटेगाव, धनगर टाकळी, आलेगाव गावात 30 मिनिटं गारा आणि जोरदार पाऊस झाला. अनेक ठिकाणी वादळी वाऱ्यामुळे शेतात असलेल्या आखड्यांवरील पत्रे उडून गेले.
या घटनेमध्ये तालुक्यात 6 पुरुष आणि तीन महिला जखमी झाल्या असून एका महिलेचा उपचारा दरम्यान मृत्यू झाला. चुडावा येथील 35 वर्षीय महिला भागीरथीबाई कांबळे अस मृत महिलेचं नाव आहे. पावसापासून बचावासाठी त्या शेतातील गोठ्यात जाऊन बसल्या होत्या. माणसांसोबत जनावरेही जखमी झाली असून अचानक झालेल्या या गारपीट आणि वादळी वाऱ्यामुळे जनजीवन अस्ताव्यस्त झालं आहे.
दरम्यान, नांदेड जिल्ह्यातील हदगाव तालुक्यातील निवघा, नांदेड तालुक्यातील लिंबगाव भागात वादळी वाऱ्यासह पाऊस आणि गारपीट झाली.
विदर्भातील वाशिम जिल्ह्यातही गारपिटीचा फटका बसला. वाशिम जिल्ह्याच्या कारंजा तालुक्यात अनेक ठिकाणी गारपीट आणि वादळी वाऱ्यासह पाऊस झाला. कारंजा तालुक्यातील भामदेवी परिसरात गारपिटीचा शेतीला मोठा फटका बसला आहे.