Gunratna Sadavarte : शरद पवारांच्याघरावरील हल्ला प्रकरणी आरोपी असलेले आणि छत्रपती घराण्यावर आक्षेपार्ह टिप्पणी केल्याच्या आरोपाखाली सातारा पोलिसांच्या कोठडीत असलेल्या सदावर्ते यांची पोलीस कोठडी आज संपत आहे. त्यांना आज कोठडीतून कोर्टात हजर करण्यात आलं. यावेळी जेलमधून बाहेर पडताच त्यांनी माध्यमांच्या प्रतिनिधींसमोर व्हिक्ट्रीचं साईन दाखवत घोषणाबाजी केली. यावेळी त्यांनी 'भारत जितेगा, जुर्म हारेगा', जुलुम कधी टिकत नसतो, जुलुम पराभूत होत असतो, असं म्हणत व्हिक्ट्रीचं साईन दाखवलं.
सदावर्ते यांना दिलासा मिळणार की अडचणी वाढणार याचा फैसला काही वेळात होणार आहे. मुंबई, साताऱ्या व्यतिरिक्त पुणे, कोल्हापूर, बीड, अकोला या ठिकाणीही सदावर्तेंवर गुन्हा दाखल आहे. त्यामुळे या जिल्ह्यातील पोलीस सदावर्तेंचा ताबा मिळवण्याचा प्रयत्न करण्याची शक्यता आहे.
गुणरत्न सदावर्ते यांना न्यायालयात घेऊन जाताना कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सातारा पोलिसांनी खबरदारी मोठा पोलिस बंदोबस्त लावला आहे. मोठा पोलीस फौजफाटा हा सातारा शहर पोलीस ठाण्याच्या आवारात दिसून आला.
मुंबई, सातारा, कोल्हापूरनंतर आता बीडमध्ये गुन्हा दाखल
गुणरत्न सदावर्ते यांच्या अडचणी संपण्याचा नाव नाही घेत आहेत. मुंबई, सातारा, कोल्हापूरनंतर बीडमध्येही त्यांच्याविरोधात गुन्हा दाखल झाला आहे. भाजपचे शहराध्यक्ष स्वप्निल गलधर यांनी गुणरत्न सदावर्ते यांच्या विरोधामध्ये बीडच्या शिवाजीनगर पोलीस ठाण्यामध्ये तक्रार दाखल केली होती. यामध्ये सदावर्ते यांनी छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल अपशब्द वापरणे मराठा समाजाला अत्याचारी समाज, असे संबोधित करणे. मराठा आरक्षण संदर्भात वेळोवेळी त्यांनी मराठा समाजाचा अपमान केला त्याचबरोबर चर्चेत राहण्यासाठी सदावर्ते यांनी माध्यमांसमोर जाऊन मराठा समाजाच्या भावना वारंवार दुखावल्या आहेत, अशी तक्रार स्वप्निल गलधर यांनी बीड पोलिसात दिली होती.
सातारा शहर पोलीस ठाण्यामध्ये राजेंद्र निकम यांनी गुणरत्न सदावर्ते याच्याविरोधात तक्रार दिल्यानंतर गुन्हा दाखल करण्यात आला होता. याप्रकरणीच गुणरत्न सदावर्ते यांना अटक करण्यात आली होती. शरद पवारांच्या घरासमोर आंदोलन झाल्यानंतर अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याआधी त्यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती. अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्यासोबतच इतर 109 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्यांना न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.