Gunratna Sadavarte : सुरुवातीला मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावरून आणि सध्या एसटी कर्मचाऱ्यांच्या मुद्द्यावरून चर्चेत असणारी व्यक्ती म्हणजे अॅड. गुणरत्न सदावर्ते. सदावर्ते गेल्या काही वर्षांपासून मराठा आरक्षणाविरोधात त्यांच्या कायदेशीर लढाईमुळे चर्चेत आले. त्यानंतर ते आता एसटी कामगारांच्या आंदोलनामुळे चांगलेच चर्चेत आहेत. दातांचे डॉक्टर असणारे सदावर्ते यांच्या हायकोर्टातील वकील होण्यापर्यंतचा नांदेड ते मुंबई असा प्रवास तुम्हाला माहित नसेल. आम्ही तुम्हाला त्यांच्या आतापर्यंतच्या प्रवासाबाबत सविस्तर सांगणार आहोत.
अॅड. गुणरत्न सदावर्ते हे मूळचे नांदेड येथील रहिवासी आहेत. नांदेड येथील एका मध्यमवर्गीय कुटुंबात त्यांचा जन्म झाला. नांदेड शहरातील सोमेश कॉलनी येथील मूळ रहिवाशी आहेत. सदावर्ते यांचे वडील निवृत्ती सदावर्ते पोलीस खात्यात कर्मचारी होते. अॅड. गुणरत्न सदावर्ते आणि डॉ. राजरत्न सदावर्ते ही निवृत्ती सदावर्ते यांची दोन मुले आहेत. गुणरत्न सदावर्ते हे हायकोर्टात वकील असून त्यांचे बंधू डॉ. राजरत्न सदावर्ते हे मुंबईत डॉक्टर आहेत.
नांदेड येथील नेहरू इंग्लिश स्कुल या शाळेत अॅड. गुणरत्न सदावर्ते यांचे दहावीपर्यंतचे प्राथमिक आणि माध्यमिक शिक्षण झाले. त्यानंतर सायन्स कॉलेज नांदेड याठिकाणी त्यांनी महाविद्यालयीन शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर त्यांचे BDS चे वैद्यकीय शिक्षण, LLB आणि LLM हे शिक्षण मिलिंद कॉलेज औरंगाबाद ह्या ठिकाणी घेतले. त्यांनी भारतीय राज्यघटनेवर पीएचडी केली आहे. अॅड. गुणरत्न सदावर्ते यांनी नांदेड येथील गुरु गोविंद सिंग वैद्यकीय रुग्णालयात 1999 साली एक वर्षे डॉक्टर म्हणून नोकरी केलीय.
अॅड. गुणरत्न सदावर्ते यांच्या पत्नी जयश्री पाटील ह्या मुंबई हायकोर्टात वकील आहेत. माहूर येथील स्वातंत्र्य सैनिक डॉक्टर लक्ष्मण पाटील हे त्यांचे सासरे आहेत. तर बालशौर्य पुरस्कार प्राप्त झेन सदावर्ते आणि योणा ह्या दोन मुली आहेत. सदावर्तेंनी 2002 सालापासून मुंबई हायकोर्टात वकिली करण्यास सुरुवात केलीय. मराठा आरक्षण, सेंट जॉर्ज विद्यार्थी आंदोलन, अनिल देशमुख मनीलॉंड्रिंग, एसटी महामंडळ कर्मचारी विलीनीकरण, के. इ. एम, जेजे हॉस्पिटल कर्मचारी आंदोलना आशी विविध नामांकित आणि विवादित प्रकरणी त्यांनी वकिली केली.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
- ST Strike : संपाचा तिढा! एसटी संपात आतापर्यंत काय झालं? जाणून घ्या सविस्तर
- राज्यातील 19 लाख विद्यार्थ्यांचे आधार कार्ड बनावट! तपासासाठी समिती; औरंगाबाद खंडपीठाचे आदेश
- सोमय्या पिता-पुत्र आज पोलीस चौकशीला हजर राहणार नाहीत, वकिलांची माहिती; आयएनएस विक्रांत बचाव निधीप्रकरणी समन्स
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha