Gulab Raghunath Patil : जळगाव जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्याचे पाणी पुरवठा मंत्री गुलाबराव पाटील यांचे द्वितीय चिरंजीव विक्रम पाटील यांचा सोमवारी विवाहसोहळा पार पडला. जळगाव जिल्ह्यात पाळधी गाव परिसरात असलेल्या साई मंदिर प्रांगणात शाही विवाह समारंभ झाला. पाटलांच्या घरी सर्वसामान्य शेतकरी कुटुंबातील मुलगी सून म्हणून आली आहे. गुलाब पाटील यांच्या मुलाच्या लग्नाला राज्यातील अनेक मंत्र्यांनी हजेरी लावली. राज्याच्या मंत्री मंडळ मधील नवाब मलिक, जयंत पाटील, दादा भुसे, बाळासाहेब थोरात, सुनील केदार, अदिती तटकरे, दीपक केसरकर, अनिल परब, संजय बनसोडे, उदय सामंत,  तसेच भाजप नेते गिरीश महाजन यांच्या सह अनेक राजकीय नेते उपस्थित होते. विवाहसोहळ्यात कोरोना नियमांचा विसर पडल्याचं दिसत होतं. काही मंत्र्यांनी मास्क परिधान केलेले नव्हतं. तर लोकांनी सोशल डिस्टन्सिंग नियमाचा फज्जा उडावला होता.


कोरोनाचा नवीन व्हेरिएंटमुळे राज्यात चिंता व्यक्त केली जात आहे. राज्य शासनाकडून यासाठी नियमावली जारी केली आहे. एक डिसेंबरपासून ही नवी नियमावली लागू होत आहे. पण मास्क वापरणे आणि सोशल डिस्टन्सिंग यासारख्या नियमांचं काठोकेरपणे पालन करण्यात यावं, हे सर्वांसाठीच सक्तीचं आहे. असं असाताना लग्नसोहळ्याला हजारोंची गर्दी दिसत होती. लोकांची झुंबड उडाल्याचं पाहायला मिळालं. लग्नाला येणाऱ्यांना मास्क दिले जात होते, मात्र लोक मास्क परिधान करताना दिसत नव्हते. इतकेच काय,  राज्यातील मंत्री आणि राजकीय नेतेही कोरोना नियमांबाबत फारसे गंभीर नसल्याचं मंत्री गुलाबराव पाटील यांच्या मुलाच्या विवाहात पाहायला मिळाले. विवाहात हजेरी लावलेल्या राज्यातील मंत्र्यांनी कधी मास्क घातला होता तर कधी काढला असल्याचं पाहायला मिळाले.काही मंत्री मात्र या बाबत अतिशय गंभीर असल्याचं पाहायला मिळाले, त्यांनी शेवटपर्यंत मास्क परिधान केला होता.


लग्नात मास्क परिधान करण्याचं आवाहन -
लग्नाला होणारी गर्दी पाहता जनतेला मास्क घालण्याचे आवाहन या विवाह समारंभात गुलाबराव पाटील यांनी वारंवार केले होते. एवढेच नव्हे तर प्रत्येक उस्पस्थित नागरिकांसाठी मंडपात प्रवेश करताना मास्कचे वाटपही केले होते. तसेच सॅनिटायझरही उपलब्ध करुन दिलं होतं.   


गुलाबराव पाटील यांची सून कोण आहे?
गुलाबराव पाटील यांनी आपल्या घरी येणारी सून ही मोठ्या राजकिय नेत्याची किंवा उद्योगपती परिवारातील न निवडता सर्व सामान्य शेतकरी परिवारातील शोधली आहे. गुलाबराव पाटील यांना राजकीय जीवनात ज्या गावाने  आणि माणसांनी साथ दिली अशा चोपडा तालुक्यातील सन्फुले गावामधील भगवान भिका पाटील या शेतकऱ्याची बी इ कॉम्पुटर शिकलेली मुलगी प्रेरणा गुलाबराव पाटील यांची सून झाली आहे.  मुलगा विक्रांत हा मेकॅनिकल इंजिनियर असून पाळधी गावातच त्याचे वर्क शॉप आहे, मंत्री गुलाबराव राजकारणात सक्रिय असले तरी त्यांच्या सूनबाई कडील परिवार मात्र राजकारणात सक्रिय नाही. गुलाबराव पाटील यांची सून उच्च शिक्षित असली तरी एका सर्वसामान्य शेतकरी परिवार मधील असल्याने, गुलाबराव पाटील यांनी गाव खेड्यातील आपली नाळ या निमित्ताने जोडून ठेवली असल्याचं पाहायला मिळत आहे.