Gujarat Air India Plane Crash: अहमदाबाद येथील दुर्दैवी विमान अपघातात (Gujarat Air India Plane Crash) उरण तालुक्यातील न्हावा गावची रहिवासी आणि हवाई सुंदरी मैथिली मोरेश्वर पाटील (Maithili Patil) हिचा दुर्दैवी मृत्यू झाला. वयाच्या अवघ्या 23 व्या वर्षी आकाशात झेपावलेली ही मुलगी मृत्यूच्या कवेत गेल्याने पाटील कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. घरातील कर्ती मुलगी आणि आधारवड हरवल्याने संपूर्ण गावात हळहळ व्यक्त केली जात आहे.

15 वर्षांपासून मामाच्या घरी राहणाऱ्या बहिणीची जबाबदारी उचलणारी बहीण-

मैथिलीच्या पश्चात तिची धाकटी बहीण दृष्टी पाटील ही आहे, जी सध्या B.tech शिकत आहे. वडिलांचे आजारपण आणि घरच्या परिस्थितीमुळे दृष्टी मागील १५ वर्षांपासून मामाच्या घरी राहत होती. मात्र तिच्या शिक्षणाची जबाबदारी पूर्णपणे मैथिलीने उचलली होती. एअर होस्टेस म्हणून नोकरी करत असताना मैथिली आपल्या धाकट्या बहिणीला डॉक्टर, इंजिनिअर बनवण्याचे स्वप्न पाहत होती. आज त्या स्वप्नाला मोठा धक्का बसला आहे.

एकमेव कमावती व्यक्ती हरवली-

पाटील कुटुंबात आर्थिक परिस्थिती बेताचीच होती. वडील मोरेश्वर पाटील हे एका खासगी कंपनीत लहान पदावर कार्यरत होते, मात्र काही वर्षांपूर्वी त्यांना शारीरिक आजारांमुळे नोकरी सोडावी लागली. आई गृहिणी असून त्यांच्या उत्पन्नाचा कोणताही स्रोत नव्हता. अशा वेळी मैथिलीने आपल्या कुटुंबासाठी हवाई क्षेत्रात काम करत, प्रत्येक जबाबदारी हसतमुखाने पेलली. तीच घरातील एकमेव कमावती व्यक्ती होती. आता तिच्या अकस्मात निधनामुळे पाटील कुटुंब आर्थिक व मानसिक संकटात सापडले आहे.

मैथिलीचं आयुष्य - एका झेपेची कहाणी-

मैथिलीने आपलं प्राथमिक ते बारावीपर्यंतचं शिक्षण उरणमधील एल.के.एम. हायस्कूलमध्ये पूर्ण केलं. शिस्तप्रिय, अभ्यासू, मनमिळावू अशी तिची ओळख शिक्षकांपासून वर्गमित्रांपर्यंत सर्वांमध्ये होती. तिच्या शाळेच्या मुख्याध्यापिका डॅसी पॉल यांनी सांगितले की, “मैथिली ही फारच हुशार आणि समजूतदार मुलगी होती. तिचं स्वप्न मोठं होतं आणि तिने ते पूर्णही केलं. मात्र नियतीला ते मान्य नव्हतं.”

गावात शोककळा, आमदारांचा सांत्वन दौरा-

मैथिलीच्या निधनाची बातमी गावात पोहोचताच गावात शोककळा पसरली. स्थानिक आमदार महेश बालदी यांनी तिच्या वडिलांची भेट घेऊन कुटुंबाला सर्वतोपरी मदतीचे आश्वासन दिले. “ही मुलगी उरणच्या मुलींना प्रेरणादायी ठरली होती. तिचं असं जाणं अत्यंत वेदनादायक आहे. आम्ही तिच्या कुटुंबाच्या पाठीशी आहोत,” असे आमदार बालदी यांनी सांगितले.

कृष्णा आणि भागवत गितेवार होता विश्वास-

कृष्णावर प्रेम करणारी हवाई सुंदरी मैथिली पाटीलचा भगवत गीतेवर विश्वास होता. मैथिलीच्या डोळ्यांत अनेक स्वप्नं होती. बहिणीचं शिक्षण, घराचं सुसंवादित आयुष्य, आणि स्वतःचं आभाळातले यश. पण एक अपघात, एक काळोख आणि एक अपूर्ण स्वप्न तिच्या आयुष्याचं अंतिम सत्य बनून राहिलं. तिच्या जाण्यानं उरण, न्हावा गाव, आणि तिच्या सख्या मित्रपरिवारात कायमची पोकळी निर्माण झाली आहे.

संबंधित बातमी:

Air India Plane Crash In Ahmedabad: दोन एअर होस्टेस, काका-काकी जळत होते; मी विमानातून सीटसह बाहेर फेकला गेलो, बचावलेल्या प्रवाशाने थरार सांगितला!

Ahmedabad Air India Plane Crash: बॉलिवूड हिरोईनलाही लाजवेल असं सौर्दंय, डोंबिवलीच्या एअर होस्टेस रोशनी सोनघरेचं लग्नाचं स्वप्न अधुरंच राहिलं