मुंबई : राज्यातील कंटेन्मेंट झोन वगळता इतर भागातील निवास व्यवस्था असलेली हॉटेल्स आणि रीसॉर्टस्, होम-स्टे, बी अँड बी (बेड अँड ब्रेकफास्ट), फार्म स्टे सुरू करण्याबाबत पर्यटन संचालनालयामार्फत नियमावली जाहीर करण्यात आली आहे. मिशन बिगीन अगेन च्या अंतर्गत हा निर्णय सरकारने घेतला आहे.


मिशन बिगीन अगेनअंतर्गत शासनाने निवासी सुविधांना (हॉटेल, लॉज, रिसॉर्टस् इत्यादी) शंभर टक्के क्षमतेने सुरु करण्यास संमती दिली आहे. पण हे करताना कोरोनाचा प्रदुर्भाव रोखण्यासाठी विविध उपाययोजनांची काटेकोर अंमलबजावणी करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या सूचनांचा अंतर्भाव पर्यटन संचालनालयाने जाहीर केलेल्या एसओपीमध्ये करण्यात आला आहे. केंद्रीय आरोग्य मंत्रालय, केंद्रीय पर्यटन मंत्रालय, डब्ल्युएचओ, यूएनडब्ल्युटीओ यांच्याकडून जारी करण्यात आलेल्या मार्गदर्शिकेनुसार ही एसओपी तयार करण्यात आली आहे.


एसओपीमध्ये विविध मार्गदर्शक बाबींचा समावेश




  • हॉटेल्स आणि रिसॉर्टस् यांनी सर्व प्रवाशांची आगमनस्थळी थर्मल गन आदींसारख्या साहित्यामार्फत तपासणी करावी. फक्त लक्षणे नसलेल्या पर्यटक तथा प्रवाशांनाच प्रवेश देण्यात यावा.

  • सेवा देताना तसेच वेटींग रुम आदी सर्व ठिकाणी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करण्यात यावे.

  • कॉन्टॅक्ट ट्रेसिंगसारख्या बाबीसाठी संबंधीत प्रवाशाची माहिती प्रशासन किंवा आरोग्य यंत्रणेला देण्याबाबत संबंधीत प्रवाशाची नाहरकत घेण्यात यावी.

  • प्रवाशांनी मास्कचा वापर करणे अनिवार्य आहे. सर्व आवश्यक ठिकाणी हॅन्ड सॅनिटायजर ठेवण्यात यावा.

  • पैशांची हाताळणी करताना योग्य ती काळजी घेण्यात यावी आणि डिजीटल माध्यमातून चलनाची देवाण-घेवाण करण्यास प्रोत्साहन द्यावे.

  • हॉटेल आणि रिसॉर्टमध्ये राहणाऱ्या पर्यटकांची ने-आण करण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या वाहनांची प्रत्येक वेळी स्वच्छता करण्यात यावी.

  • पर्यटकांची ट्रॅव्हल हिस्ट्री, हेल्थ हिस्ट्री आदीबाबतची माहिती असणारा आरोग्यविषयक अर्ज चेक-इन करण्यापूर्वी शक्यतो ऑनलाईन भरुन घेण्यात यावा.

  • शक्य असल्यास क्यू आर कोडसारख्या प्रणालीतून स्वयं चेक-इनसारख्या बाबी सुरु कराव्यात.

  • काय करावे आणि काय करु नये (डूज आणि डोन्टस्) संदर्भातील माहिती पर्यटकांना बूकलेट किंवा व्हीडीओच्या स्वरुपात देण्यात यावी.

  • पर्यटकांनी त्यांच्या सामानाची स्वत: ने-आण करावी.

  • एकापेक्षा जास्त लिफ्ट असल्यास समोरासमोर संपर्क टाळण्याच्या दृष्टीने वर जाणे आणि् खाली येण्यासाठी वेगवेगळ्या लिफ्टचा वापर करण्यात यावा.

  • रुम सर्व्हीस संपर्करहीत असावी. मागवलेली ऑर्डर रुमच्या बाहेर ठेवण्यात यावी.

  • लहान मुलांसाठीचे प्ले एरिया बंद राहतील.