चंद्रपूर : सध्या संपूर्ण जग हे कोरोना महामारीचा मुकाबला करत आहे. या काळात अनेक गोष्टी आपल्यासाठी नवीन होत्या तसेच काही शब्द सुद्धा पहिल्यांदाच आपल्या कानावर पडले आणि आता ते शब्द रोजच्या वापरात रूढ झालेत. क्वॉरंटाईन, सॅनिटायझर, लॉकडाउन हे शब्द तर आपण दिवसातून कितीवेळा उच्चारतो हे कदाचित आपल्यालाच ठावूक नसेल. यातलाच एक शब्द म्हणजे "लॉकडाउन". या शब्दाचा तसा अर्थ होतो टाळेबंदी किंवा "सबकुछ बंद". कधी एकदा हा "लॉकडाउन" हटणार असं आपल्या सर्वांनाच झालं आहे. पण हाच लॉकडाउन काळ काही सकारात्मक आणि चिरकाळ आपल्याला लक्षात राहील अशा गोष्टी आपल्याला देत आहे. चंद्रपूर शहरात हेच अधोरेखित करणारी एक छोटीशी, काहीशी शुल्लक पण रंजक अशी घटना घडली आहे.
चंद्रपूर शहरात असलेल्या जगन्नाथ बाबा नगर येथे एका मैदानाला "लॉकडाउन ग्राउंड" असं नाव देण्यात आलंय. या भागातले रहिवासी या मैदानाला नुसतं हे नाव देऊन थांबले नाही तर त्यांनी या नावाचा एक फलक तयार करून बाकायदा त्याचे उद्घाटन देखील केले आहे. आता कदाचित तुम्हाला प्रश्न पडेल की ही "लॉकडाउन ग्राउंड" काय भानगड आहे. तर यामागे आहे एक छोटीशी गोष्ट आहे. तुमच्या-आमच्या सर्वांच्याच शहरात एखाद्या ले-आऊट मध्ये असतं अगदी तसं या भागात एक मोकळं मैदान होतं. या मोकळ्या जागेत खड्डे, पाणी, चिखल आणि झुडपं होती. रोजच्या धकाधकीत कोणी या मैदानाकडे ढुंकून देखील पाहत नव्हतं. पण अचानक लॉकडाउन सुरु झालं आणि सर्व काही बदललं. घरात बसून लोकांना कंटाळा यायला लागला आणि याच दरम्यान आपला हा कंटाळा घालवण्यासाठी काय करता येईल याच्या शक्यता चाचपडल्या जाऊ लागल्या.
श्रमदानातून सुसज्ज मैदान
संकल्प कॉलनीच्या लोकांनी हाच कंटाळा घालवण्यासाठी हे दुर्लक्षित मैदान स्वच्छ केलं. या ठिकाणी असलेली झुडपं काढली आणि माती टाकून खड्डे बुजवले. त्यानंतर लोकवर्गणीतुन 2 लाख रुपये खर्च करून आणि श्रमदानातून इथे सपाटीकरण करून खेळण्याचे मैदान तयार केले. रिकामा वेळ घालवण्यासाठी म्हणून सुरु केलेल्या या उद्योगाला चांगलं रूप आलं आणि शेवटी या मैदानाचं बारसं करण्याचे ठरले. कोणाच्या तरी डोक्यातून लॉकडाउन काळात हे मैदान तयार झाले म्हणून याला "लॉकडाउन ग्राउंड" नाव द्यावे अशी आयडियाची कल्पना आली आणि या मैदानाचं विधिवत बारसं पार पडलं.
लॉकडाउनमुळे माणसं जवळ आली..
"लॉकडाउन ग्राउंड" या नावामागचा हा प्रवास रंजक तर आहेच. पण अनेक चांगले बदल या मैदानामुळे या कॉलनीत झाले. या कॉलनीत नोकरी पेशा असणारे आणि त्यातही मुख्यत्वे शिक्षक असणारे लोकं जास्त आहे. ऑफिस-शाळा-कॉलेज झालं की घर-परिवार, टीव्ही-मोबाईल या मध्ये लोकांचा उर्वरित वेळ निघून जायचा. पण आता या ग्राउंडमुळे लोकं संध्याकाळी एकत्र यायला लागली आहे. लहान मुलं मैदानी खेळ खेळू लागले आहे. विशेष म्हणजे वर्षानुवर्षे एकाच कॉलनीत राहून देखील एकमेकांना न ओळखणारी माणसं आता एकमेकांच्या चांगल्या परिचयाची झाली आहेत. लॉकडाउनमुळे लोकांचे लांबचे प्रवास थांबले असतील पण चार पावलावर राहणारी जिवाभावाची माणसं या लॉकडाउन ग्राउंडमुळेच लोकांना गवसली हे देखील तितकंच खरं.
Chandrapur Corona | चंद्रपुरात मैदानाला दिलं 'लॉकडाऊन ग्राऊंड' असं नाव