मुंबई : काँग्रेसचे माजी मुंबई अध्यक्ष आणि माजी मंत्री कृपांशकर सिंह यांच्याविरोधात एसीबीने एकूण 19 मालमत्तांचा तपशील दिला आहे. या मालमत्तांचा व्यवहार योग्य प्रकारे झाला आहे की नाही याची शहानिशा करण्यासाठी याचा गुन्हा नोंदवून तपास सुरू केला असल्याची माहिती ईडीने सोमवारी हायकोर्टात दिली. त्यामुळे कृपाशंकर सिंह यांच्या अडचणी वाढण्याची शक्यता आहे.


ईडीचे वकील हितेन वेणेगावकर यांनी न्या. अभय ओक आणि न्या. अनुजा प्रभूदेसाई यांच्या खंडपीठाला ही माहिती दिली. त्याचवेळी आयकर विभागाने याप्रकरणी प्रत्युत्तर सादर करण्यास वेळ मागितल्याने न्यायालयाने ही सुनावणी चार आठवड्यांसाठी तहकूब केली.

सिंह यांची 320 कोटी रुपयांची बेहिशेबी मालमत्ता आहे. त्याची चौकशी करावी, अशी मागणी करणारी जनहित याचिका संजय तिवारी यांनी केली. या याचिकेची दखल घेत न्यायालयाने फेब्रुवारी 2012 मध्ये पोलिसांना गुन्हा नोंदवून चौकशी करण्याचे आदेश दिले होते. याचं आरोपपत्रही दाखल झालं होतं.

त्यानंतर तुलसीदास नायर यांनी सिंह यांच्याविरोधात स्वतंत्र याचिका दाखल केली. सिंह यांच्याकडे शस्त्र आहेत. त्यांची बेहिशेबी मालमत्ता आहे. राजकीय दबावामुळे पोलीस सिंह यांच्या विरोधातील तक्रार घेत नाहीत आणि चौकशी करत नाहीत. तेव्हा सिंह यांची सीबीआयकडून चौकशी करावी, अशी मागणी नायर यांनी याचिकेत केली आहे.

नायर यांच्या याचिकेची दखल घेत न्यायालयाने कृपाशंकर सिंह यांच्याविरोधातील चौकशीचा तपशील सादर करण्याचे आदेश ईडीला दिले होते. त्यानुसार ईडीने कोर्टात माहिती दिली.

संबंधित बातम्या :

कृपाशंकर सिंह अडचणीत, आता ईडी, आयकर विभागाकडून चौकशीची शक्यता


बेहिशेबी मालमत्ता प्रकरण: कृपाशंकर सिंहांच्या संपत्तीवर टाच येणार