नागपूर : लग्न झाल्याचे पुरावे वारंवार देऊनही लग्नाचं प्रमाणपत्र देण्यास टाळाटाळ करणाऱ्या ग्रामसेवकाला एका जोडप्याने चांगलाच धडा शिकवला आहे. कागदपत्रं देऊनही काही उपयोग होत नाही, यामुळे या जोडप्याने चक्क ग्रामसभेतच पुन्हा एकदा लग्न केलं. ग्रामसेवक आणि लोकांसमोरच पुन्हा एकमेकांना हार घातले. यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी ग्रामसेवकाला तातडीने लग्नाचं प्रमाणपत्र देण्याचे आदेश दिले.

नागपूर जिल्हयातल्या जलालखेडा गावात ही घटना घडली. सुरेंद्र आणि अश्विनी निकोसे यांचं जुलै महिन्यात लग्न झालं होतं. एका नोंदणीकृत संस्थेच्या कार्यालयात लग्न केल्यानंतर ग्रामपंचायतीत लग्न प्रमाणपत्रासाठी सर्व कागदपत्रं त्यांनी दिली होती. मात्र, ग्रामसेवक आनंद लोलुसरे यांनी असं लग्न मान्य होणार नाही. त्यासाठी तुम्हाला नरखेड कोर्टात कोर्ट मॅरेज करुन तिथली कागदपत्रे सादर करावी लागतील. त्यानंतरच ग्रामपंचायतीतून लग्न प्रमाणपत्र मिळेल, असं सांगितलं होतं.



त्यामुळे आपल्या लग्नाला प्रमाणित करण्यासाठी या जोडप्याने पुन्हा नरखेडच्या तालुका न्यायालयात लग्न केलं आणि पुन्हा जलालखेडा ग्रामपंचायतीत लग्न प्रमाणपत्रासाठी अर्ज केला. तरीही ग्रामसेवक प्रमाणपत्रसाठी वेगवेगळी कारणं सांगून अडवणूक करत होता. यामुळे त्रस्त झालेल्या सुरेंद्र आणि अश्विनी यांनी अचानक ग्रामसभेत  ग्रामविकास विभागाच्या अधिकाऱ्यांसमोर पुन्हा एकमेकांना हार घालून लग्न केलं.

या प्रकारामुळे तिथे उपस्थित अधिकारीही गोंधळले. गावकऱ्यांनी हा सर्व प्रकार अधिकाऱ्यांना सांगितल्यानंतर, त्यानंतर ग्रामसेवकाला त्वरित लग्न प्रमाणपत्र देण्याचे निर्देश दिले.