मुंबई:  महाराष्ट्रात अनेक ग्रामपंचायत निवडणुकांचा (Maharashtra Gram Panchayat Election 2022)  आज निकाल लागतोय.  राज्यातील अनेक दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला लागलीय. बीडच्या नाथ्रा गावात पंकजा मुंडे आणि धनंजय मुंडे यांचे कार्यकर्ते कधी नव्हे ते एकत्र आलेत. चुलत बंधू अभय मुंडे यांच्या विजयासाठी पंकजा आणि धनंज मुंडेंचे कार्यकर्त्यांची एका पाहायला मिळाली तर नवगण राजुरी येथे जयदत्त क्षीरसागर यांची प्रतिष्ठा पणाला लागलीय. औरंगाबादेत संदीपान भुमरे यांनी ताकद लावलीय. तिथं महाविकास आघाडी विरुद्ध शिंदे गट असा सामना रंगला आहे. 


मराठवाड्यात दिग्गजांची प्रतिष्ठा पणाला


जालन्यातील जवखेडा या गावात केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे यांनी प्रयत्न करूनही तीस वर्षांची बिनविरोध निवडणुकीची परंपरा खंडित झालीय. माजी आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्या मतदारसंघातील कुंभार पिंपळगावच्या निकालांकडेही सगळ्यांचं लक्ष लागलंय. परभणीच्या जिंतूरमध्ये भाजप आमदार मेघना बोर्डिकर विरुद्ध राष्ट्रवादीच्या विजय भांबळे यांनी ताकद लावलीय. त्याचप्रमाणे प्रचंड संघर्ष असलेल्या राणाजगजीतसिंह आणि ओमराजे निंबाळकरांची उस्मानाबादेत प्रतिष्ठा पणाला लागलीय.


कोकणात शिंदे-भाजप गटातील नेत्यांमध्ये थेट चुरस


कोकणामध्येही दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे. रायगड जिल्ह्यातील एकूण 240 ग्रामपंचयतींपैकी 50 ग्रामपंचायती या बिनविरोध झाल्या आहेत.  रायगड जिल्ह्यात भरत गोगावलेंची प्रतिष्ठा पणाला लागलीये. मतदार राजा नेमका कुणाला कौल देणार याकडे संपूर्ण जिल्ह्याचे लक्ष लागलंय. रत्नागिरीतल्या मालगुंड ग्रामपंचायतमध्ये होणारी लढत ही प्रतिष्ठेची असणार आहे कारण या ठिकाणी शिंदे विरुद्ध ठाकरे गट अशी सरळ लढत होणार आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील फोंडा, पिंगुळी, माणगाव, कलमट, नांदगाव या महत्वाच्या ग्रामपंचायती आहेत. यातील सर्वच ग्रामपंचायत राणेंकडे आहेत. मात्र या ग्रामपंचायती राणेंना भाजपकडे वळवणे मोठ्या जिकरीचे बनलं आहे. त्याला कारण अंतर्गत गटबाजी, त्यामुळे या महत्वाच्या ग्रामपंचायत कोणाकडे जातात हे पाहणं महत्वाचे आहे. 


उत्तर महाराष्ट्रातील ग्रामपंचायत निवडणुकीत चुरस


अनेक दिग्गजांनी ताकद लावल्यामुळे उत्तर महाराष्ट्रातील ग्रामपंचायत निवडणुकीत चांगलीच चुरस निर्माण झालीय. पालकमंत्री दादा भुसे यांचं मालेगाव, छगन भुजबळ यांचा येवला, शिंदे गटाचे आमदार सुहास कांदे यांच्या नादगावमध्ये अनेक ग्रामपंचातींच्या निकालांकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलंय. तर केंद्रीय आरोग्य राज्यमंत्री भारती पवार यांच्या दिंडोरी मतदारसंघातही सात ग्रामपंचायतींचे निकाल लक्षवेधी ठरले आहेत. तर तिकडे अहमदनगरच्या जामखेडमध्ये आमदार रोहित पवार यांची प्रतिष्ठा पणाला लागलीय. आमदार निलेश लंके, बाळासाहेब थोरात, विखे-पाटील यांनीही अनेक ग्रामपंचायत निवडणुकीत ताकद लावलीय. तर तिकडे गिरीश महाजन आणि खडसेंच्या मतदारसंघातही अनेक ग्रामपंचायत निकालांकडे लक्ष लागलंय.


कोल्हापूरमध्ये  सतेज पाटील, नरके आणि धनंजय महाडिक यांची प्रतिष्ठा पणाला


सांगली जिल्ह्यातील 447 ग्रामपंचायतींमधील 28 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. भाजपा आमदार गोपीचंद पडळकर यांच्या मातोश्री हिराबाई पडळकर आटपाडी तालुक्यातील पडळकरवाडी सरपंच पदी बिनविरोध निवडून आल्यात. कोल्हापूर जिल्ह्यातील 43 ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत.  तर चंदगड तालुक्यातील 40 पैकी सात ग्रामपंचायती बिनविरोध झाल्या आहेत. कोल्हापूरमध्ये  सतेज पाटील, नरके आणि धनंजय महाडिक यांची प्रतिष्ठा पणाला लागलीये. तर  उत्तर सोलापूर तालुक्यातील मार्डी येथे भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष शहाजी पवार आणि राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष बळीराम काका साठे यांची प्रतिष्ठा पणाला लागलीये. तर बार्शी तालुक्यात  दिलीप सोपल आणि भाजपचे आमदार राजेंद्र राऊत यांची प्रतिष्ठा पणाला लागली आहे.