Pune News पुणे : अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे प्रमुख श्याम मानव (Shyam Manav) यांची शासनाने जादूटोणा विरोधी समितीत निवड केली आहे. दरम्यान, त्यांची पुढच्या 48 तासांत हकालपट्टी करावी. अशी मागणी समस्त वारकरी संप्रदायाने केली आहे. संत ज्ञानेश्वर महाराजांच्या आळंदीतून आंदोलदनाद्वारे सरकारचे लक्ष वेधण्याचा आज प्रयत्न करण्यात आला. यावेळी जमलेल्या काही वारकऱ्यांनी हातात फलक घेत ही मागणी लावून धरली होती. त्यामुळे शासन आता या मागणीची कितपत दखल घेतं, हे पाहणे आता महत्वाचे ठरणार आहे.
समितीवरुन 48 तासांत हकालपट्टी करा, अन्यथा....
जादूटोणा विरोधी समितीमधील श्याम मानव हे वेळोवेळी वादग्रस्त वक्तव्य करून हिंदू -सनातन धर्माच्या भावना दुखावत असल्याचा आरोप यावेळी वारकऱ्यांकडून करण्यात आला आहे. जर शासनाने हकालपट्टी केली नाही तर राज्यभर आंदोलन करण्याचा इशाराही यावेळी देण्यात आलाय. संत ज्ञानेश्वर महाराजांवर वक्तव्य केलं गेलं, मात्र अद्याप त्यांच्यावर कारवाई का केली नाही? असा प्रश्न ही यावेळी उपस्थित करण्यात आला. त्यामुळे या मागणीची दखल घेत सरकारने या प्रकरणी दखल घेत न्याय द्यावा, नाही तर आम्ही न्यायालयाचे ही दार ठोठावु, अशी भूमिका यावेळी वारकऱ्यांकडून घेण्यात आली आहे.
श्याम मानव यांनी काय आरोप केले होते?
अजित पवारांनी पार्थ पवारांच्या उपस्थितीत देवगिरी बंगल्यावर बोलावून गुटखा व्यवसायिकांकडून दर महिन्याला कोट्यवधींची कमाई करून द्यावी अशी मागणी केल्याचा जबाब तपास यंत्रणांकडे द्या. अनिल देशमुखानी तपास यंत्रणांपुढे चौकशीत उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे, अनिल परब, अजित पवार आणि पार्थ पवार यांचे नाव विविध खोट्या प्रकरणात घेतले तर ईडीच्या प्रकरणात सोडून देऊ, अशी थेट ऑफर त्यांना देण्यात आल्याचा धक्कादायक दावा श्याम मानव यांनी केला होता.
अनिल देशमुख यांना ते गृहमंत्री असताना काही लोकांकडून सांगण्यात आले होते की तुम्हाला ईडीच्या प्रकरणातून स्वतःची सोडवणूक करून घ्यायची असेल तर तुम्ही 100 कोटी रुपयांच्या वसुली प्रकरणात उद्धव ठाकरे यांचं नाव घ्यावे. आदित्य ठाकरे यांचं नाव दिशा सॅलियन बलात्कार आणि हत्या प्रकरणात घ्यावे. अनिल परब यांचेही नाव त्यांच्याशी संबंधित बेकायदेशीर व्यवहारांच्या प्रकरणात घ्यावे. मात्र अनिल देशमुख यांनी तसं केलं नाही असे श्याम मानव म्हणाले.
श्याम मानव सुपारीबाजांच्या नादी लागले का?
अनिसचे प्रमुख श्याम मानव यांनी केलेल्या आरोपांवर प्रतिक्रिया देताना देवेंद्र फडणवीस म्हणाले की, श्याम मानव मला इतके वर्षे ओळखतात, आरोप करण्यापूर्वी मला एकदा विचारायला हवं होतं. अलिकडच्या काळात अनेक सुपारीबाज तयार झाले आहेत. सुपारी घेऊन आरोप करणे हे त्यांचं काम आहे. त्या सुपारीबाजांच्या नादाला श्याम मानव लागले का हे पाहावं लागेल.