मुंबई : राज्य सरकारने ड्युटीवर हजर न झालेल्या 104 सरकारी डॉक्टरांची नियुक्ती रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे. या डॉक्टरांची राज्यातील विविध भागातील प्राथमिक आरोग्य केंद्रात नियुक्ती करण्यात आली होती, पण हे डॉक्टर आपल्या कामाच्या ठिकाणी गैरहजर राहिल्यामुळे हा जीआर जारी करण्यात आला आहे.


राज्यातील ग्रामीण भागात डॉक्टरांनी वैद्यकीय सेवा द्यावी, यासाठी सरकार विविध उपाययोजना करतं. डॉक्टरांना त्यांना हव्या असलेल्या ठिकाणी पोस्टिंगही मिळते. पण, काही डॉक्टर पोस्टिंग मिळाल्यानंतर त्या ठिकाणी कामावर रुजू होत नाहीत, अशा डॉक्टरांवर सरकारने कारवाईचा बडगा उगारला आहे.

सरकारने पोस्टिंग घेणाऱ्या मात्र कामाच्या ठिकाणी गैरहजर राहिलेल्या 104 डॉक्टरांवर कारवाई केली आहे. राज्य सरकारच्या आरोग्य विभागाने 22 फेब्रुवारीला हा जीआर जारी केला आहे. ज्यात जे डॉक्टर आपल्या कामाच्या ठिकाणी रुजू झाले नाहीत त्यांची नियुक्ती रद्द करण्यात आल्याची माहिती मिळत आहे.