मुंबई : राज्यात राष्ट्रपती राजवट लागू झाल्यानंतर काँग्रेस आणि राष्ट्रवादीने संयुक्त पत्रकार परिषद घेत आपली भूमिका जाहीर केली. काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये आधी चर्चा होईल. आमच्या गोष्टी स्पष्ट झाल्यानंतर पुढे शिवसेनेसोबत चर्चा करु, असं काँग्रेस नेते अहमत पटेल यांनी म्हटलं आहे. तर राज्यपालांनी आम्हाला भरपूर वेळ दिला आहे, आता आम्ही निवांत निर्णय घेऊ, असं शरद पवारांनी म्हटलं आहे.
राज्यपालांनी आम्हाला भरपूर वेळ दिला आहे. सर्वांशी चर्चा करुन कॉमन मिनिमम कार्यक्रम ठरवला जाईल. सरकार झालं तर ते कसं चालेल हे स्पष्ट होत नाही तोपर्यंत पुढे जाणार नाही. सरकार बनवायचं आहे की नाही, बनवायचं असेल तर कोणत्या मुद्यांवर सरकार स्थापन करायचं याची चर्चा केली जाईल. राज्यपालांनी आता खूप वेळ दिलाय त्यामुळे काही घाई नाही, निवांत निर्णय घेऊ, असं शरद पवारांनी म्हटलं आहे.
राज्यपालांना काँग्रेसला नाही बोलावलं, हे चुकीचं : अहमद पटेल
राज्यात लागू केलेल्या राष्ट्रपती राजवटीवर काँग्रेस नेते अहमद पटेल यांनी टीका केली. याच सरकारने उत्तराखंड, गोवा सारख्या राज्यात मनमानी कारभार केला आहे. राष्ट्रपती राजवट लागू होणे, लोकशाहीची थट्टा आहे. राष्ट्रपती राजवट ज्या पद्धतीने लागू झाली, त्याचा निषेध करतो. या सरकारने मनमानी केली आहे. त्याची निंदा करावी तितकी कमी आहे, अशी टीका अहमद पटेल यांनी केली. राज्यपालांनी मोठे पक्ष म्हणून भाजप, शिवसेना आणि राष्ट्रवादीला सत्तास्थापनेचं निमंत्रण दिलं, मात्र काँग्रेसला बोलावलं नाही, हे चुकीचं आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीमध्ये चर्चा झाल्यानंतर काही गोष्टी स्पष्ट झाल्यानंतर आम्ही शिवसेनेशी चर्चा करु आणि पाठिंबा द्यायचा की नाही ठरवू, असं अहमद पटेल यांनी म्हटलं.
आम्हाला काल शिवसेनेकडून अधिकृत प्रस्ताव आला होता. सर्व महत्वपूर्ण निर्णयांवर सखोल चर्चा झाली पाहिजे. प्रत्येक गोष्टीवर सखोल चर्चा झाल्यानंतर पुढची रणनिती स्पष्ट केली जाणार आहे, असं राष्ट्रवादीचे नेते प्रफुल पटेल यांनी म्हटलं आहे.