पंढरपूर : शेतकऱ्यांची दिवाळी गोड करण्याचं आश्वासन देणाऱ्या राज्य सरकारने काही शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीचे पैसे जमा केले. मात्र ते पैसे पुन्हा सरकारच्या खात्यात वळते झाल्याने शेतकऱ्यांची झोप उडालीय. धक्कादायक बाब म्हणजे या अनोख्या कारभारामुळे बँक अधिकारी देखील बुचकळ्यात पडले आहेत.


पंढरपूरच्या उपरीच्या देवानंद जगदाळेंनी विदर्भ कोकण ग्रामीण बँकेकडून 64 हजार 401 रुपयाचं कर्ज घेतलं होतं. फडणवीस सरकारच्या कर्जमाफीत जगदाळेंसह 8 कर्जदारांना कर्जमाफी मिळाली.

शेतकऱ्यांच्या खात्यात 31 ऑक्टोबरला कर्जाची रक्कम जमाही झाली. बँकेने मेसेज पाठवून कर्जखाते संपल्याचं कळवलं. पण कर्जमुक्तीचा आनंद फार काळ टिकला नाही. हे पैसे पुन्हा वळते करुन घेतल्याचं जगदाळेंना कळलं.

जगदाळेंप्रमाणेच गादेगावच्या अर्जुन कदमांचेही जमा झालेले पैसे सरकारने परत काढून घेतले आहेत. दिवाळीच्या पूर्वसंध्येला उस्मानाबादमध्ये मंत्री महादेव जानकरांनी ज्या 23 शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली, त्यात बावीचे भारत तांबे होते. पण दीड लाखाऐवजी तांबेना 10 हजार रुपयांचं कर्जमाफी प्रमापत्र मिळालं.

दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना कर्जमाफीची भेट दिल्याचं श्रेय सरकारला घ्यायचं होतं. शेतकऱ्यांची दिवाळी गोड केल्याचं दाखवायचं होतं. पण ही फक्त कर्जमाफीची प्रसिद्धीच होती का, असा प्रश्न पडतो. कारण संपूर्ण महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना... होय मी लाभार्थी आहे... असं म्हणायचं...  असं होईल का?