नागपूर : परदेशात शिक्षण घेऊन चांगलं करिअर घडवण्याचं स्वप्न अनेक मुलं बघतात. मुलांच्या या स्वप्नपूर्तीसाठी अनेक पालक पोटाला चिमटा काढून पै पै जमवतात. मात्र परदेशात शिक्षण घेताना ऐऱ्यागैऱ्या एजंटवर विश्वास ठेवाल तर त्याची मोठी किंमत तुम्हाला मोजावू लागू शकते.
विदर्भासह राज्यभरातल्या 140 विद्यार्थ्यांवर असंच एक मोठं संकट ओढावलं होतं. ते संकट तुमच्यावर किंवा तुमच्या मुलांवर ओढवू नये, असं तुम्हाला वाटत असेल तर हा रिपोर्ट नक्की पाहा.
चंद्रपूरची ऐश्वर्या खोब्रागडे... नीटच्या परीक्षेत अपयश आल्याने खचली होती. पण वे टू अब्रॉड या कन्सल्टन्सीची जाहिरात आली. त्यात थेट यूक्रेनमध्ये एमबीबीएस करण्याची संधी होती. पुण्यात सेमिनारही अटेंड केला आणि एजंट संदीप सिंहच्या सांगण्यावरुन आर. जे. ट्रेडर्स या कंपनीच्या नावे 2 लाख 10 हजार भरले. थेट यूक्रेनमध्ये अॅडमिशन मिळाल्याने सगळेच खूश होते. पण ऐश्वर्या यूक्रेनमध्ये पोहोचली आणि तिला धक्काच बसला.
ऐश्वर्याने अॅडमिशनसाठी तब्बल 2 लाख 10 हजार रुपये भरले होते. पण त्यातला एकही नवा पैसा एजंटने कॉलेजमध्ये जमा केला नव्हता. त्यामुळे कॉलेजने त्यांना प्रवेश नाकारला. फसगत झालेली ऐश्वर्या एकटीच नव्हती, तर तब्बल 140 मुलांच्या बाबतीच हेच झालं होतं.
तिकडे ऐश्वर्याने ट्वीट करुन आपली व्यथा मांडली. इकडे ऐश्वर्याच्या पालकांनी आमदारांच्या भेटीगाठी सुरु केल्या. मुलांच्या व्यथांच्या ट्वीट्सची जणू चेन तयार झाली. ऐश्वर्याचा ट्वीट भांगडियांनी रीट्विट केला. भांगडियांचा ट्वीट नितीन गडकरींनी सुषमा स्वराज यांना टॅग केला आणि त्यानंतर थेट परराष्ट्र मंत्रालयाने यात हस्तक्षेप केला.
ऐश्वर्याच्या एका ट्वीटमुळे यूक्रेनमधल्या 140 भारतीय विद्यार्थ्यांना न्याय मिळाला. त्यामुळे तुमची मुलं थेट परदेशी शिकायला जाणार असतील तर आधी पूर्ण खातरजमा करा आणि मगच सीमोल्लंघन करा.