बीड : विधानसभेचे विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांच्यानंतर आता मुख्यमंत्री फडणवीस यांच्या सहकारी मंत्र्यांनीच सरकारवर हेरगिरीचा आरोप केला आहे. सरकार पाळत ठेवत असल्याचे पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी बीडमधील जाहीर सभेत म्हटले.

“बंद दरवाजाआड आमची चर्चा सुरु होती. तिथेही पोलिस घुसले आणि मी काय काय बोलतोय, त्याची शूटिंग केली गेली. आता राज्यातील मंत्र्याच्या मिटिंगमध्येही तुम्ही पोलिस पाठवताय आणि तुमच्याच मंत्र्याचा गोपनीय अहवाल तुम्हीच तयार करताय, असे सरकार मी माझ्या उभ्या आयुष्यात पाहिले नाही.”, अशी खंत रामदास कदम यांनी व्यक्त केली.

“मी गृहराज्यमंत्री होतो. पण असे काम कधी केले नाही. विरोधी पक्षांसंदर्भात समजू शकतो, विरोधी पक्ष काय बोलतात ते बघू वगैरे. पण सत्ताधारी पक्षातील मंत्री काय करतोय, हे पाहण्यासाठी सुद्धा पोलिस पाठवत आहात, असे कधी आयुष्यात पाहिले नाही.”, असेही रामदास कदम म्हणाले.

मी मुख्यमंत्र्यांना भेटून त्यांना यासंदर्भात विचारणार आहे, असे सांगून रामदास कदम पुढे म्हणाले, “पायाखालची वाळू निसटतेय ना, म्हणून यांचे डोके ठिकाणावर राहत नाही.”

दरम्यान, याआधी विधानसभेचे विरोधीपक्ष नेते राधाकृष्ण विखे-पाटलांच्या पत्रकार परिषदेत स्पेशल ब्राँचच्या दोन पोलिस अधिकाऱ्यांनी छुप्या रितीने हजेरी लावल्यानं एकच खळबळ उडाली होती. सरकार विरोधकांवर पाळत ठेवत असल्याचा गंभीर आरोप काँग्रेसनं केला होता.

संबंधित बातम्या :

कथित हेरगिरीची चौकशी करा, विखे पाटलांची राज्यपालांकडे मागणी

‘सरकार विरोधकांवर पाळत ठेवत आहे’, विखे-पाटलांचा गंभीर आरोप