कोल्हापूर : देशात यंदा ऊस गळीत हंगामात साखरेचं उत्पादन कमीच आहे. या पार्श्वभूमीवर केंद्रीय अन्नपुरवठा मंत्री रामविलास पासवान यांनी एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. सणासुदीच्या काळात बाजारात साखरेचे दर नियंत्रणात ठेवण्यासाठी साखर कारखान्यांवर स्टॉकचं लिमिट आणलं आहे.

रामविलास पासवान यांनी ट्विट करुन याबाबतची माहिती दिली







साखर कारखान्यांवरील निर्बंधांमुळे कारखान्यांकडे उपलब्ध साखरेच्या साठ्यापैकी सप्टेंबर महिन्यात फक्त 21 टक्के साखर ठेवता येणार आहे. तर ऑक्टोबर महिन्यात 8 टक्के साखरेचा साठा करता येणार आहे.

गेल्या ऊस गळीत हंगामात, राज्यात साखरेचे उत्पादन 42 लाख मेट्रिक टन झालं होत. 2015-16 च्या तुलनेत हे उत्पादन अर्धेच होतं. तर यंदा 2016-17 मध्येही देश पातळीवर ऊस गळीत हंगामात साखरेचे उत्पादन कमीच आहे. या सर्व पार्श्वभूमीवर केंद्रीय अन्नपुरवठा मंत्री रामविलास पासवान यांनी स्टॉकच लिमिट निर्णय घेतल्याचं बोललं जात आहे.

दरम्यान, या वर्षीच्या गळीत हंगामात कोल्हापुरात ऊसाला पहिल्या साडे नऊ टक्के रिकव्हरीला 2550 रुपये प्रति टन एफआरपी मिळणार आहे . त्यामुळे जर साखरेचे दर घसरले तर पुढे एफआरपी देण्यास अडचण निर्माण होणार आहे.

त्यामुळे याचे दूरगामी परिणाम साखर कारखान्यांनाच भोगावा लागणार असल्याने, कारखानदारांनी या निर्णयाबाबत नाराजी व्यक्त केली आहे.