मुंबई : लिंगायत धर्माला स्वतंत्र धर्माचा दर्जा देण्यास केंद्र सरकारने नकार दिला आहे. स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष आणि खासदार राजू शेट्टी यांनी डिसेंबर 2018 मध्ये लोकसभेमध्ये नियम 377 नुसार लिंगायत धर्माला स्वतंत्र दर्जा देण्यासंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता.


लिंगायत धर्माचा स्वतंत्र ध्वज, धर्मग्रंथ असून महात्मा बसवेश्वर यांनी लिंगायत धर्माची स्थापना केली आहे. या धर्माला स्वतंत्र धर्म म्हणून मान्यता देण्यासाठी देशभरातील लिंगायत धर्म एकवटून रस्त्यावर उतरले आहेत. त्यामुळे त्यांचा तो कायदेशीर अधिकार आहे. यासाठी लिंगायत धर्माला स्वतंत्र दर्जाचा द्यावा, अशी मागणी राजू शेट्टी यांनी 19 डिसेंबर 2018 रोजी लोकसभेत नियम 377 नुसार सूचना मांडताना केली होती.

राजू शेट्टींना गृह विभागातील सहसचिव एस. सी. एल. दास यांनी 2 जुलै 2019 रोजी पत्र लिहून केंद्र सरकारचं याबाबतीत उत्तर कळवलं आहे. केंद्र सरकारने लिंगायत धर्मास स्वतंत्र दर्जा देण्यास असमर्थता दर्शवली आहे. लिंगायत आणि वीरशैव हे हिंदू धर्माचाच भाग असल्याचं यामध्ये म्हटलं आहे.

केंद्र सरकारची ही भूमिका लिंगायत समाजावर अन्याय करणारी असल्याची भावना राजू शेट्टी यांनी व्यक्त केली आहे. यापुढे लिंगायत समाज कोणतं पाऊल उचलणार, याची संपूर्ण समाजाला उत्सुकता आहे.