करंट अकाऊंट, कॅश क्रेडिट आणि ओव्हरड्राफ्टसाठी आठवड्यातून आता 50 हजार रुपये काढण्याची मुभा देण्यात आली आहे. उलाढालीच्या सोयीसाठी सरकारनं हा निर्णय घेतला आहे. नोटबंदीनंतर 25 हजार रुपयेच काढण्याची मुभा होती, मात्र आता दुपटीने वाढवण्यात आली आहे.
शेतकऱ्यांना खतं-बियाणं, शेतीसंबंधीच्या वस्तू खरेदी करण्यासाठी कर्जाच्या रकमेतून आठवड्याला 25 हजार रुपये काढण्याची मुभा देण्यात आली होती. मात्र आता ती वाढवून 50 हजारांवर नेण्यात आली आहे.
नोटाबंदीनंतर इतर महत्त्वाचे निर्णय :
1. दोन हजार रुपयांपर्यंतच जुन्या नोटा बदलता येणार
दोन हजार रुपयांपर्यंतच जुन्या नोटा 30 डिसेंबरपर्यंत फक्त एकदाच बदलता येणार. याचा अर्थ दोन हजारापेक्षा जास्त रकमेच्या हजार-पाचशेच्या नोटा तुमच्याकडे असतील, तर त्या वाया जाणार असा होत नाही. तुम्ही हे पैसे बँकेत तुमच्या खात्यावर जमा करु शकता. त्यानंतर सोयीनुसार एटीएममधून ही रक्कम काढू शकता. वारंवार येणारे ग्राहक टाळण्यासाठी बोटाला शाई लावणार.
2. साडेचार हजार रुपयांच्या मर्यादेचा दुरुपयोग
साडेचार हजार रुपयांच्या मर्यादेचा दुरुपयोग असल्याचं निरीक्षण अर्थमंत्री अरुण जेटलींनी नोंदवलं. काळा पैसा पांढरा केला जात होता, त्यामुळे गरजूंना पैसे मिळत नव्हते आणि बँकांसमोरील रांगाही कमी होत नव्हत्या. मात्र नवीन व्यवस्थेमुळे याला चाप बसण्याची आशा आहे.
3. लग्नघरांना सरकारचा दिलासा
ज्यांच्या घरी लग्न आहे, त्यांना आता बँक खात्यातून अडीच लाख रुपये काढता येणार आहेत. केंद्रीय अर्थसचिव शक्तिकांत दास यांनी दिल्लीत घेतलेल्या पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली. लग्नासाठी अडीच लाख रुपये काढता येणार आहे. मात्र यासाठी लग्नपत्रिका आणि स्वयंघोषणापत्र दाखवणं गरजेचं आहे. तसंच घरातील केवळ एकाच व्यक्तीच्या बँक खात्यातून ही रक्कम काढता येणार आहे.
4. पेट्रोल पंपांवरही पैसे काढता येणार
देशातील काही पेट्रोल पंपावर 2 हजारांपर्यंतची रक्कम काढता येणार आहे. पहिल्या टप्प्यात अडीच हजार पेट्रोल पंपावर ही सुविधा सुरु करण्यात येईल. पेट्रोल पंपवर 2000 पर्यंत रक्कम काढता येणार आहे. आरबीआय आणि एसबीआय संयुक्तपणे ही मोहीम राबविणार आहे. ज्या पेट्रोल पंपावर स्टेट बँक ऑफ इंडिया (SBI)च्या पीओएस (कार्ड स्वाईप मशीन) आहेत तिथेच ही सुविधा असणार आहे. सुरुवातीला 2500 पेट्रोल पंपावर पैसे काढता येणार आहे.
24 नोव्हेंबरपर्यंत पेट्रोल पंपावर 500 आणि 1000 च्या नोटा स्वीकारण्याचे आदेशही देण्यात आले आहेत. यामुळे एटीएम बाहेरच्या रांगा काही प्रमाणात कमी होतील.
5. राष्ट्रीय महामार्गांवरील टोलवसुली 24 नोव्हेंबरपर्यंत बंद
24 नोव्हेंबर 2016 च्या मध्यरात्रीपर्यंत देशभरातील राष्ट्रीय महामार्गांवरील टोलवसुली बंद करण्यात आली आहे. केंद्रीय रस्ते व परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी याबाबत माहिती दिली.