Gopikishan Bajoria : विधानपरिषदेच्या निवडणुकीत (Maharashtra Vidhan Parishad Election 2021) पराभूत झालेले शिवसेनेचे माजी आमदार गोपीकिशन बाजोरिया यांनी निकालाच्या तब्बल महिनाभरानं भाष्य केलं आहे. घरभेद्यांनीच पराभव घडवून आणल्याचा खळबळजनक आरोप बाजोरिया यांनी केला आहे. बाजोरिया यांचा भाजपच्या वसंत खंडेलवाल यांनी पराभव केला. त्यांनी कुणाचं नाव घेतलं नसलं तरी शिवसेनेचे दोन खासदार आणि तीन आमदारांवर त्यांचं रोख असल्याचं बोललं जातं आहे.


अकोला विधानपरिषदेत सेनेचे गोपीकिशन बाजोरियांच्या पराभवानंतर आता त्यावरून पक्षात घमासान रंगण्याची चिन्ह आहे. या पराभवाच्या बरोबर महिनाभरानंतर याचे पडसाद शिवसेनेत उमटतांना दिसत आहेत. या निवडणुकीत शिवसेनेतील काही घरभेद्यांनीच आपला पराभव घडवून आणल्याचा खळबळजनक आरोप गोपीकिशन बाजोरियांनी केला आहे. 'एबीपी माझा'शी 'एक्सक्लुझिव्ह' बाचचित करताना त्यांनी या विषयावर मन मोकळं केलं आहे. 


विधान परिषदेच्या अकोला-वाशिम-बुलढाणा स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या निवडणुकीचा निकाल 14 डिसेंबरला लागला होता. या निवडणुकीत तब्बल तिनदा या मतदारसंघाचं प्रतिनिधित्व करणाऱ्या सेनेच्या गोपीकिशन बाजोरियांचा पराभव झाला होता. भाजपचे मदन खंडेलवाल यांनी बाजोरियांचा तब्बल 109 मतांनी पराभव केला होता. आपला पराभव पक्षातीलच काही लोकांनी घडवून आणल्याचा खळबळजनक आरोप बाजोरियांनी केला आहे. त्यांनी यावेळी कुणाचंही नाव घेतलं नसलं तरी शिवसेनेचे दोन खासदार आणि तीन आमदारांवर त्यांचा रोख असल्याची माहिती मिळत आहे. यातील दोषींवर पक्षप्रमुख उद्धव ठाकरे निश्चितच कठोर कारवाई करणार असल्याचं ते म्हणाले होते. 


पाहा व्हिडीओ : 'घरच्यांनी' केलेला घात व्यथित करणारा, गोपीकिशन बाजोरिया EXCLUSIVE



पक्षातील या नेत्यांच्या भूमिकेवर बाजोरिया समर्थकांचं प्रश्नचिन्ह


खासदार अरविंद सावंत : निवडणुकीचे प्रभारी आणि अकोल्याचे माजी संपर्कप्रमुख
प्रतापराव जाधव : बुलडाण्याचे शिवसेना खासदार 
संजय रायमूलकर : मेहकरचे शिवसेना आमदार 
संजय गायकवाड : बुलडाण्याचे शिवसेना आमदार 
नितीन देशमुख : अकोला जिल्ह्यातील बाळापूरचे सेना आमदार 


गोपीकिशन बजोरिया यांचा धक्कादायक पराभव 


भाजपने महाविकास आघाडीला अकोला अकोला-वाशिम-बुलडाणा स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद मतदारसंघात धक्का दिला होता. भाजपने महाविकास आघाडीचे, शिवसेनेचे विद्यमान आमदार गोपीकिशन बाजोरिया यांचा धक्कादायक पराभव करत 'बाजोरिया पॅटर्न' मोडीत काढला होता. भाजपच्या वसंत खंडेलवाल यांनी बाजोरिया यांचा जवळपास 109 मतांनी पराभव केला.  तब्बल तीन टर्मपासून आमदार असलेले शिवसेनेचे गोपीकिशन बाजोरियांचा पराभव करत भाजपचे खंडेलवाल 'जायंट किलर' ठरले होते.अकोला-वाशिम-बुलडाणा स्थानिक स्वराज्य संस्था विधान परिषद मतदारसंघात वसंत खंडेलवाल यांना 443 मते मिळाली होती. तर, शिवसेना-महाविकास आघाडीचे उमेदवार गोपीकिशन बाजोरिया यांना 334 मते मिळाली. महाविकास आघाडीचे जवळपास 80 मते फुटली असल्याचे समोर आलं होतं. 


हा मतदारसंघ 1998 पासून गेली चार टर्म शिवसेनेच्या ताब्यात होता. विशेष म्हणजे या चारही निवडणुकीत शिवसेनेकडे मतदारांचं बहुमत नसतानाही त्यांनी विजयाचा 'चमत्कार' घडवून आणला आहे. 1998 मध्ये शिवसेनेचे राजेंद्र पाटणी या मतदारसंघातून विजयी झाले होते. त्यानंतर 2004 पासून शिवसेनेकडून गोपीकिशन बाजोरिया सलग तीनवेळा या मतदारसंघातून विजयी झाले आहेत. बाजोरिया सध्या विधान परिषदेत पक्षाचे मुख्य प्रतोद आहेत. त्यामुळे त्यांच्या पराभवामुळे शिवसेनेला धक्का बसला आहे.


मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह