पंढरपूर : 'आजवर तुम्ही आमचे रक्त प्यायलात, आता आम्ही आमच्या रक्ताचे दान देतोय, आतातरी आम्हाला आरक्षण द्या', अशी मागणी आमदार गोपीचंद पडळकर यांनी केली आहे. धनगर आरक्षणासाठी राज्यभर रक्तदान मोहीम सुरु केली आहे.


मराठा आणि धनगर आरक्षणाचा प्रश्न सध्या ऐरणीवर आला असताना धनगर समाजाचे फायर ब्रँड नेता म्हणून ओळख असलेल्या आमदार गोपीचंद पडळकर यांनी आता धनगर आरक्षणासाठी राज्यभर रक्तदानाची मोहीम हाती घेतली आहे. 'आजवर तुम्ही आमचे रक्त पित आला आता आम्हीच आमच्या रक्ताचे दान देतोय , आतातरी धनगर समाजाला आरक्षण द्या' असा टोला त्यांनी राज्य सरकारला लगावला आहे. गोपीचंद पडळकर यांच्या आवाहनानंतर राज्यभरात रक्तदानाची मोहीम धनगर तरुणांनी हाती घेतली असून आत्तापर्यंत पाच हजार रक्ताच्या पिशव्या जमा झाल्याचे पडळकर यांनी सांगितले . मंगळवेढा तालुक्यातील नंदेश्वर येथे एका कार्यक्रमात आले असताना त्यांनी समाजातील तरुणांना आवाहन केले. सध्याच्या कोरोनाच्या काळात या रक्ताची गरज गोरगरीब रुग्णांना असून त्यांच्यासाठी या रक्ताचा उपयोग होईल असेही त्यांनी सांगितले .


धनगर आरक्षणाच्या मागणीवरून आता धनगर समाज आक्रमक झालेला आहे. भाजपाचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी राज्य सरकार विरोधात आंदोलनाची हाक दिली आहे. या अगोदर कुंभकर्णाप्रमाणे झोपी गेलेल्या या सरकारला जागे करण्यासाठी राज्यभर "ढोल बजाव, सरकार जगाव" हे आंदोलन करण्यात आले होते. धनगर आरक्षणाच्या मागणीसाठी मुख्यमंत्र्यांनाही आपण पत्र पाठवून तातडीने आरक्षणाच्या बाबतीत निर्णय घेण्याची मागणी केली होती. मात्र सरकारकडून धनगर समाजाला आरक्षण देण्याबाबत दुजाभाव होत आहे, त्यामुळे आता समाजाच्या मागण्यांसाठी पुन्हा एकदा रस्त्यावर उतरण्याची वेळ आली असल्याचे पडळकर यांनी म्हटले आहे.