Gopichand Padalkar: भाजपचे वादग्रस्त आमदार गोपीचंद पडळकर यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार कुटुंबीयांवर नाव न घेता अत्यंत आक्षेपार्ह शब्दांत टीका केली आहे. पुण्यात सांगलीतील ऋतुजा पाटील हत्या प्रकरणानंतर हिंदुत्ववादी संघटनांच्या मोर्चात भाषण करताना त्यांनी हे वादग्रस्त विधान केलं. त्यांच्या वक्तव्यामुळे राज्यात राजकीय वातावरण चांगलंच तापलं आहे. पडळकर म्हणाले, “संकष्टीच्या दिवशी मटण, एकादशीच्या दिवशी चिकन, आणि त्यानंतर दगडूशेठ गणपतीला जातात. त्या घरात सासू ख्रिश्चन आहे, नवरा ब्राह्मण आहे, बाप मराठा आहे आणि आई दुसरीच. असं ते कॉकटेल घर आहे.” त्यांनी जाणीवपूर्वक पवार कुटुंबीयांकडे सूचक इशारा करत ही टीका केली.
मंगळसूत्र चोरीप्रकरणी अटक झाली होती, अशा व्यक्तींना नैतिक अधिकार नाही
या वक्तव्यावर राष्ट्रवादी काँग्रेस (शरद पवार गट) कडून तीव्र प्रतिक्रिया उमटली आहे. पक्षाचे नेते प्रशांत जगताप यांनी पडळकरांवर टीका करताना सांगितले की, “ज्यांची ग्रामपंचायतीमध्येही निवडून येण्याची पात्रता नाही, अशांना भाजपकडून जबाबदारी दिली जाते. आणि ते लोक विरोधी पक्षातील नेत्यांवर गलिच्छ शब्दांत टीका करतात. पडळकर यांच्यावर मंगळसूत्र चोरीप्रकरणी अटक झाली होती. अशा व्यक्तींना नैतिक अधिकार नाही.”
भाजपकडून कोणतीही कारवाई झाली नसल्याचा आरोप
गोपीचंद पडळकर हे पूर्वीही अशा वादग्रस्त वक्तव्यांमुळे चर्चेत राहिले आहेत. बारामती मतदारसंघात निवडणुकीदरम्यान शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे यांच्यावर अनेक वेळा त्यांनी जातीवाचक, धार्मिक आणि वैयक्तिक स्वरूपाच्या टीका केल्या आहेत. मात्र त्यांच्या विधानांवर सत्ताधारी भाजपकडून कोणतीही कारवाई झाली नसल्याचे आरोप होत आहेत. या नव्या वक्तव्यामुळे पुन्हा एकदा महाराष्ट्रात राजकीय तणाव वाढण्याची शक्यता असून, समाजमाध्यमांवरूनही पडळकरांवर टीकेची झोड उठवली जात आहे. भाजपने या प्रकाराकडे दुर्लक्ष केल्यास त्याचा राजकीय फटका आगामी निवडणुकांमध्ये बसू शकतो, अशी शक्यता राजकीय विश्लेषक व्यक्त करत आहेत. गोपीचंद पडळकर हे वारंवार टीकेत राहिले आहेत कारण ते आक्षेपार्ह भाषा वापरून विरोधकांवर, विशेषतः पवार कुटुंबीयांवर, जहाल टीका करत असतात. त्यांच्या भाषणांची शैली नेहमीच उन्माद दाखवणारी आणि राजकीय वाद निर्माण करणारी राहिली आहे.
इतर महत्वाच्या बातम्या