नागपूर : काँग्रेसमधील चांगल्या नेत्यांना भारतीय जनता पक्षात घेणार असून वाईट काँग्रेसींना मात्र पक्षात प्रवेश दिला जाणार नाही, असे विधान भाजप नेते आणि वनमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केले आहे. नागपूर येथे मुनगंटीवार यांनी आज माध्यमांशी संवाद साधला.


मुनगंटीवार म्हणाले की, काँग्रेस पक्ष म्हणजे मुदत संपलेलले औषध झाले आहे. काँग्रेसचा आता कुठलाच परिणाम उरलेला नाही. आता काँग्रेस पक्षात जे काही मोजके चांगले लोक आहेत, जे सेवाभावनेतून राजकारण करतात, अशा नेत्यांना भाजपमध्ये घेण्याचा विचार सुरु आहे. परंतु काँग्रेसमधील जे वाईट लोक आहेत त्यांना मात्र भाजपमध्ये आजिबात प्रवेश मिळणार नाही.

दरम्यान, चंद्रपूरमधील काँग्रेसचे नवनिर्वाचित खासदार बाळू धानोरकर यांनी चंद्रपुरातील दारुबंदी उठवण्याबाबत केलेल्या मागणीवरही मुनगंटीवार यांनी प्रतिक्रिया दिली. ते म्हणाले की, आजवर काँग्रेस पक्षाचे सदस्य होण्यासाठी 'मी मद्यपान करत नाही आणि करणारही नाही', अशी शपथ घ्यावी लागत होती. तसेच काँग्रेसचे सदस्यत्व घेण्यासाठी जे शुल्क भरावे लागत होते, त्या शुल्काच्या पावतीमागे मद्यपान न करण्याची अट छापलेली असते. परंतु आता धानोरकर यांच्या या नव्या मागणीनंतर काँग्रेस पक्षाने त्या जुन्या पावत्या फाडून फेकून द्याव्यात, असा टोला मुनगंटीवार यांनी लगावला आहे.